Latest Posts

रिझर्व्ह बँकेने लाँच केले उद्गम वेब पोर्टल

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : देशभरातील विविध बँकांमध्ये हजारो कोटी रुपये बेवारसपणे पडून आहेत. या रक्कमांवर कोणीही दावा केला नाही. परंतु सामान्य लोकांना आपल्या अशी बँकेतील रक्कम शोधण्यासाठी रिझर्व्ह बँकेनेपुढाकार घेतला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उद्गम (UDGAM) नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे (RBI Launches UDGAM For Unclaimed Deposits). या पोर्टलद्वारे कोणतीही व्यक्ती बँकांमध्ये दावा न केलेल्या ठेवी शोधू शकतात.

RBI ने याबाबत माहिती देताना सांगितले की, गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी हे वेब पोर्टल लॉन्च केले आहे. हे पोर्टल RBI ने स्वत विकसित केले आहे. या वेबपोर्टलच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना स्वत:च्या किंवा त्यांच्या जवळच्या आणि नातेवाईकांच्या नावाने बँकांमध्ये असलेल्या, परंतु बेवारस, हक्क नसलेल्या ठेवी शोधण्यास मदत होणार आहे. ही रक्कम एकापेक्षा जास्त बँकांमध्ये ठेवली असली तरी ठेवीदारांना याची मदत होणार आहे.

६ एप्रिल २०२३ रोजी, RBI ने दावा न केलेल्या ठेवींचा मागोवा घेण्यासाठी केंद्रीकृत वेब पोर्टल विकसित करण्याची घोषणा केली. दावा न केलेल्या ठेवींचा वाढता ट्रेंड पाहता, आरबीआयने त्यावर दावा करण्यासाठी जनजागृती मोहीमही सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेने सामान्य लोकांनी दावा न केलेल्या ठेवींवर दावा करण्यासाठी त्यांच्या संबंधित बँकांशी संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.

या वेब पोर्टलच्या मदतीने ठेवीदार दावा न केलेले ठेवी खाते शोधून त्यावर दावा करू शकतील किंवा त्यांच्या संबंधित बँकांना भेट देऊन ठेव खाते पुन्हा सक्रिय करू शकतील.

आरबीआयने सांगितले की, सध्या ७ बँकांमध्ये हक्क नसलेल्या ठेवी ज्यांचे तपशील वेबसाइटवर उपलब्ध आहेत ते युजर पोर्टलला भेट देऊन ऍक्सेस केले जाऊ शकतात. इतर बँकांमध्ये जमा केलेल्या दावा न केलेल्या ठेवींचे तपशील १५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत टप्प्याटप्प्याने पोर्टलवर अपलोड केले जातील.

पहिल्या टप्प्यात या बँकांमधील ठेवीदारांना होणार फायदा –
सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर सात बॅंकांचे ठेवीदार याचा वापर करु शकतात. यामध्ये सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, डीबीएस बॅंक, धनलक्ष्मी बॅंक, पंजाब नॅशनल बॅंक, साऊथ इंडियन बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडियाचा समावेश आहे.

फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या आढाव्यात, सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये जवळपास ३५ हजार कोटींच्या हक्क नसलेल्या ठेवी पडून असल्याची आरबीआयने माहिती दिली आहे. यात १० वर्षे किंवा त्याहून अधिक काळ चालू नसलेल्या खात्यांचा समावेश आहे. एकट्या एसबीआयमध्ये ८ हजार ८६ कोटी रुपयांच्या दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत.

Latest Posts

Don't Miss