Latest Posts

मनुस्मृति वाद्यांकडून देशाचे संविधान संपविण्याचा प्रयत्न : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार 

– सिंदेवाही येथे नागरी सत्कार सोहळा : फटाक्यांची आतिषबाजी, पुष्पवृष्टी करून कार्यकर्त्यांकडून जल्लोष

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / सिंदेवाही (Sindewahi) : राज्यात सत्तेत आलेले त्रिशूळ सरकार हे मनुस्मृती विचारांचे घटनाबाह्य सरकार असून चोर चोर मावस भाऊ आपण सर्व मिळून खाऊ असा देश लुटारू पणाचा प्रकार सध्या सुरू आहे. जाती-जातीत भांडणे लावून धर्मांधतेचे विष पेरल्या जात आहे. देशात सत्ता परिवर्तन न झाल्यास देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही बड्या व्यापाऱ्यांच्या घशात जाऊन देश गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही व देशाची आगामी निवडणूक ही अंतिम निवडणूक होऊ शकते. पेटून उठा संघर्ष करा देश वाचवायचा असेल तर काँग्रेस हा एकमेव पर्याय अशा प्रखर शैलीने विरोधकांवर टीकास्त्र सोडत राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार (Leader of Opposition MLA Vijay Wadettiwar) यांनी सत्ताधाऱ्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. ते सिंदेवाही येथे तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार समारंभा प्रसंगी सत्कारमूर्ती म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमास राजुरा विधानसभा क्षेत्र आमदार तथा चंद्रपूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष (ग्रामीण) सुभाष धोटे, गडचिरोली चे माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक संदीप गड्डमवार, गडचिरोली काँग्रेस सेवा दलचे सावसाकडे, काँग्रेसचे ज्येष्ठ माजी कृउबा समिती सभापती रामचंद्र पाटील गहाने, रघुनाथ शेंडे, बाबुराव गेडाम, काँग्रेस जिल्हा महासचिव हरिभाऊ बारेकर, माजी तालुकाध्यक्ष अरुण कोलते, वीरेंद्र जयस्वाल, डॉ. केशव शेंडे, कृउबा समिती सभापती तथा काँग्रेस तालुकाध्यक्ष रमाकांत लोधे, उपसभापती दादाजी चौके, उपाध्यक्ष संजय गहाने, राहुल पोरेड्डीवार, नगराध्यक्ष स्वप्निल कावळे, उपनगराध्यक्ष मयूर सूचक, प्रामुख्याने उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शनपर बोलताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, आमदार विजय वडेट्टीवार यांना विरोधी पक्ष नेता पदाची जबाबदारी देताच विरोधकांमध्ये धडकी भरली असून विदर्भाच्या या वाघाने संपूर्ण सभागृह गाजवले आहे. तसेच केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सत्ता पूर्वीच्या काळात गॅस सिलेंडर घेऊन दरवाढीचा निषेध नोंदविला होता, आज घरगुती गॅस चार पटीने महागला आता त्या शांत का…? असा सवाल ही उपस्थित केला. तर मैत्रिणीचेच घर बळकावून चारित्र संपन्नतेचे दाखले देत स्मृती इराणी यांनी देशातील ज्वलंत प्रश्नांकडून लक्ष विचलित करण्या हेतू खा .राहुल गांधी यांचे वर अनाठाई आरोपांचे कटकारस्थान रचले जात आहे. यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या संघर्षमय जीवनाची गाथा सांगत मान्यवरांनी भाषणे केली.

समारोपीय भाषणात राज्याचे विरोधी पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार आपल्या प्रखर शैलीतून विरोधकांचा समाचार घेत देशद्रोही व राष्ट्रध्वजाच्या अवमान करणाऱ्या मनोहर भिडेला पोलीस संरक्षण देऊन मनुस्मृति वादी सरकार देशात अराजकता पसरविण्याचा प्रयत्न चालवीत आहे. देशातील गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, दिन दुबळे दलित, पीडित, शोषित यांच्यावर विविध अन्यायकारक धोरणातून सरकार सूड उगवत असून प्रचंड महागाई बेरोजगारी आदी विविध समस्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देश गुलामगिरीच्या वाटेने चालला आहे. देशात पुन्हा निवडणूक होऊ नये यासाठी संविधानाच्या नीती मूल्यावर घाला घालत निवडणूक आयुक्तांची नेमणूक करताना देशाच्या सरन्यायाधीशांना वगळण्याचे प्रयत्न चालविल्या जात आहे.

देशातील रानावनातील विविध खाणी अदानीच्या घशात घालून संपूर्ण वन उध्वस्त करण्याचा डाव आखल्या जात आहे. सन २०१८ मध्ये नोकर भरतीच्या नावावर गोरगरीब उमेदवारांकडून कोट्यावधींचा पैसा उकळून भरती प्रक्रिया न घेता कुठल्याही उमेदवारांना पैसे परत करण्यात आलेले नाही. या महा घोटाळ्यामध्ये समाविष्ट कंपन्यांनी भाजपाचे कार्यालय बांधण्यासाठी निधी पोहोचविल्याचा आरोपही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. देश वाचवायचा असेल देशातील संविधानात्मक लोकशाही टिकवायची असेल तर भाजपाला सत्तेतून पायउतार करून राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून निवडून द्या. अन्यथा देश खड्ड्यात जाईल असे आवाहन विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी यावेळी केले. यानंतर विविध सामाजिक संघटना व्यापारी संघटना काँग्रेस पक्षाचे सर्व सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी शाल व श्रीफळ देऊन विरोधी पक्षनेतेपदी नियुक्ती झाल्याबद्दल आमदार विजय वडेट्टीवार यांचा सत्कार केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगेश मेश्राम, प्रास्ताविक तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, यांनी केले. याप्रसंगी प्रामुख्याने तालुक्यातील हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

बॉक्स – शहरात तील शिवाजी चौकात वडेट्टीवार यांचे आगमन व कार्यकर्त्यांचा जल्लोष…
विरोधी पक्ष नेते विजय वडील तिवारी यांच्या गाड्यांचा ताफा सिंदेवाही शहरातील स्थानिक शिवाजी चौकात थांबताच कार्यकर्त्यांकडून एकच जल्लोष करण्यात आला. यात फटाक्यांची आतिषबाजी, क्रेनद्वारे पुष्पहार अर्पण, जेसीबी द्वारे पुष्पवृष्टी ही सत्कार समारंभाची दृश्ये लक्षणीय ठरली.

Latest Posts

Don't Miss