Latest Posts

रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान

– इच्छूक शेतकऱ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
– तुती लागवडीसाठी ३ लाख ९७ हजार अनुदान

 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : रेशीम शेती फायद्याची शेती आहे. या शेतीचे शेतकऱ्यांना महत्व पटवून देण्यासोबतच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या शेतीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. जिल्ह्यातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास भरपूर वाव तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. शेतकऱ्यांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर व्यापक प्रमाणात जनजागृती आणि तुती लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने महारेशीम अभियान २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात राबविले जात आहे.

जिल्ह्यात रेशीम लाभार्थ्यांची वाढ होण्यासाठी अभियानाच्या माध्यमातून शेतक-यांना प्रोत्साहित केले जाणार आहे. जिल्ह्याला रेशीम हब बनविण्याच्यादृष्टीने रेशीम विभागाचे प्रयत्न आहे. सन २०१७ पासून राबविल्या जात असलेल्या महारेशीम अभियानाला शेतक-यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यासाठी यावर्षी सुध्दा अभियान आयोजित करण्यात आले आहे. अभियानात प्रशासकीय यंत्रणेसोबतच कृषि क्षेत्रात कार्यरत संस्था, रेशीम लागवडीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवणा-या शेतक-यांची मदत घेतली जात आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी १ लाख ८६ हजार १८६ रुपये तर किटकसंगोपनगृह बांधकामासाठी १ लाख ७९ हजार तसेच साहित्यासाठी ३२ हजार असे तीन वर्षासाठी एकूण ३ लाख ९७ हजार ३३५ रुपये अनुदान दिल्या जाणार आहे.

Latest Posts

Don't Miss