विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : भाजप महायुती विरोधात देशपातळीवरील तयार झालेल्या इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने राज्यात अधिकृत उमेदवारी दिलेल्या उमेदवारांना आता महाविकास आघाडी- इंडिया अलायन्स पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूकीत उभे राहण्याचे आदेश दिलेले असून गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा- जराते या आता महाविकास आघाडी- इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहेत.
शेतकरी कामगार पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे चिटणीस ॲड. राजेंद्र कोरडे यांनी पक्षाच्या वतीने राज्यातील सर्व उमेदवारांना याबाबत लेखी पत्राद्वारे कळविले आहे की, शेतकरी कामगार पक्ष हा इंडिया अलायन्स आणि राज्यातील महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाने जे अधिकृत उमेदवार उभे केलेले आहेत ते इंडिया अलायन्स व महाविकास आघाडीचेच पुरस्कृत उमेदवार आहेत. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्ष भाजप महायुती विरोधात प्रचाराला सुरुवात करणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाच्या आदिवासी, भटके- विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष रामदास जराते यांनी दिली आहे.
जयश्री वेळदा – जरातेंवर दाखल आहेत ३ गुन्हे
शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार जयश्री वेळदा- जराते यांच्यावर वेगवेगळे आंदोलन केल्याबद्दल ३ गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी आपल्या शपथपत्रात दिलेली आहे. जयश्री वेळदा यांचेवर एटापल्ली पोलीस स्टेशन येथे भांदवी ३६५, भांदवी १८८, १४३, २७९ म.पो.का. ३७(१), (३), १३५ असे दोन तर गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये भादंवी १८८ म.पो.का.१३५ असा एक गुन्हा दाखल असून अहेरी व गडचिरोली न्यायालयात सदर प्रकरणे प्रलंबित आहेत.
गडचिरोली विधानसभाच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात लोकांसाठी काम करतांना, आंदोलन करतांना गुन्हे दाखल असलेल्या त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. जल, जंगल, जमीन आणि खदानविरोधी आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांपेकी एक असलेल्या जयश्री वेळदा यांनी रामदास जराते यांचेसह २०१७ मध्ये चंद्रपूर मध्यवर्ती कारागृहात १५ दिवस न्यायालयीन कोठडीत घालविलेले आहेत.