– विदर्भातील ३७ हजार ८३४ ग्राहकांची थकबाकीतून सुटका
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांना दिलासा देण्यासाठी त्यांच्यावरील थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफ करून या ग्राहकांना पुन्हा नियमित वीज जोडणी मिळवण्याची संधी देण्यासाठी महावितरणने सुरू केलेल्या अभय योजनेत सहभागी होण्यासाठी फक्त १९ दिवस शिल्लक आहेत. यानंतर प्रत्येक थकबाकीदार ग्राहकांची तपासणी करण्यात येऊन त्यांच्याकडे वीजपुरवठा सुरू असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
महावितरणच्या अभय योजनेत आतापर्यंत विदर्भातील ३७ हजार ८३४ ग्राहकांनी ४० कोटी ३३ लाख ८५ हजार रुपयांचा भरणा करून थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात माफी मिळवित थकबाकीतून मुक्तता मिळवली आहे. यात सर्वाधिक १० हजार १९६ ग्राहक नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील ५ हजार ८९३ ग्राहक, गडचिरोली जिल्ह्यातील ३ हजार ९०२ ग्राहकांचा समावेश आहे. याशिवाय अकोला (२ हजार ९२९), वाशिम (२ हजार ८७२), यवतमाळ (२ हजार ५८६), अमरावती (२ हजार ४४४), गोंदिया (२ हजार १५३), चंद्रपूर (२ हजार ००६), वर्धा (१ हजार ९२६) आणि भंडारा (९२७) या जिल्ह्यातील ग्राहकांचा समावेश आहे.
योजनेची वैशिष्ट्ये : महावितरणच्या राज्यभरातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांसाठी योजना लागू आहे. कृषी ग्राहकांचा या योजनेत समावेश नाही. या योजनेत ग्राहकांना मूळ थकबाकीच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम ६ हप्त्यांमध्ये भरण्याची सोय असून एकरकमी थकबाकी भरणाऱ्या लघुदाब ग्राहकांना १० टक्के आणि उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के सवलत दिली जात आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या (पीडी) ग्राहकांसाठी ही योजना असून या योजनेची अंतिम मुदत ३१ मार्च २०२५ ही आहे.
कायदेशीर कारवाई : प्रत्येक थकबाकीदार ग्राहकांची तपासणी करण्यात येऊन या योजनेत सहभागी न होता वीज वापरणाऱ्या ग्राहकांवर १ एप्रिल २०२५ नंतर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा महावितरणने दिला आहे.
योजनेचा लाभ कसा घ्यावा : या योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांनी महावितरणच्या www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवर किंवा महावितरणच्या मोबाईल ॲपद्वारे अर्ज करावा. याशिवाय अभय योजनेत सहभागी होण्यासाठी अधिक तपशील जाणून घेण्यासाठी १९१२, १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर अथवा महावितरणच्या स्थानिक कार्यालयात संपर्क साधावा.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक असल्याने अशा ग्राहकांवर थेट कायदेशीर कारवाई करण्याऐवजी सुविधा म्हणून ही सवलतीची योजना लागू केली असून ग्राहकांना कारवाईपासून दिलासा देण्यासाठी महावितरणने ही अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेतल्यानंतर, ग्राहक योग्य पुरावे सादर करून त्याच पत्त्यावर, त्याच नावाने अथवा नवीन नावाने वीज जोडणी घेण्यास पात्र ठरतो.
थकबाकीदार ग्राहकांनी ३१ मार्च २०२५ पूर्वी अभय योजनेत सहभागी होऊन या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन चिंतामुक्तहोण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.