Latest Posts

आठवीतल्या बालकाला भेटून भारावले पोलीस अधीक्षक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : सायकलने जात असताना पोलीस अधीक्षकांना आठवीतला एक मुलगा अचानक रस्त्यावर भेटला. साहेबांनी सहजच त्याची विचारपूस केली आणि मग काय त्यांच्यात बराच वेळ संवाद झाला. आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला यूपीएससीच्या नियोजनासोबत अभ्यासाबाबतची असलेली माहिती आहे, हे बघून पोलीस अधीक्षक साहेबही थक्कच राहिले.

चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी यांना सायकलिंग छंद आहे. त्यामुळे ते नेहमीच काही अंतर सायकलिंग करतात. दोन तीन दिवसांपूर्वी ते पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी मार्गाने सायकलिंग करीत होते. सायकलिंग करत असताना मार्गावर त्यांना एक मुलगा भेटला. तोही सायकलवरच होता. पोलीस अधीक्षक साहेब सहजपणे त्याच्याशी बोलले. त्याचे नाव विचारले. सोहम सुरेश उईके हे आपले नाव असून, मी आठवीत शिकतो, असे त्याने सांगितले. मग काय साहेब एक एक प्रश्न विचारत गेले अन् तो धाडधाड उत्तरे देत गेला. यूपीएससीच्या परीक्षेच्या नियोजनाची इत्थंभूत माहिती सोहमने एसपींना दिली. अभ्यासाशिवाय आमचे काही खरे नाही. अभ्यास केला नाही तर जीवनाला जंग लागतो व तो मला लागू द्यायचा नाही, असे आत्मविश्वासाचे बोल सोहम बोलला. आठ तास अभ्यास करायचा, एक तास मित्रासोबत खेळायचे आणि आठ तास मस्त झोप घ्यायची. आठवड्यातून एक चांगला चित्रपट जरूर बघावा, ही चर्तुसूत्री वापरली तर आयएएस होण्यापासून आपणाला कुणीही रोखू शकत नाही. एका आठवीतल्या बालकाची हुशारी बघून साहेबांनी त्याच्याशी चर्चा लांबविली. या वेळी त्यांनी आपुलकीने सोहमच्या संपूर्ण कुटुंबीयांची माहिती घेतली. तुझे बाबा काय करतात? आई काय करते, असे अनेक प्रश्न रवींद्रसिंह परदेसी यांनी विचारले. तुला हे एवढे सारे ज्ञान कुणी दिले, या प्रश्‍नावर यावर आपले मामा देवीदास मेश्राम हे आपले मार्गदर्शक असल्याचे सोहमने सांगितले. आमच्या दोन पिढ्यांत नोकरी आम्ही बघितली नाही. आता मला आयएएस होऊन ही परंपरा मोडीत काढायची असल्याचे सोहमने सांगितले.

एका ग्रामीण भागातील आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा आत्मविश्वास, जीवनाकडे त्याचा बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन,यूपीएससीच्या नियोजनाची इत्थंभूत माहिती, अभ्यासाबाबतचे त्याचे मत बघून चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी थक्कच राहिले. त्यांनी सोहमला कुठलीही अडचण आल्यास थेट मला फोन करायचा व हक्काने सांगायचे, असा विश्वास दिला.

संवेदनशील अधिकारी असला की, तो थेट सामान्यात मिसळतो. त्यांच्या वेदना, प्रश्न जाणून घेतो. असेच अधिकारी समाजात सकारात्मकता निर्माण करतात. अचानकपणे झालेल्या भेटीने एका विद्यार्थ्याच्या हुशारीची जाणीव पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांना झाली. सोहम सोबतचा त्यांचा संवाद समाजमाध्यमांत बराच चर्चिला जात आहे.

सोहम सुरेश उईके हा पोंभुर्णा तालुक्यातील डोंगरहळदी तुकूम या गावातील इयत्ता आठवी चा विद्यार्थी आहे, या मुलाचे आणि चंद्रपूर जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र सिंह परदेशी यांच्यात झालेल्या संवादाचा हा व्हिडीओ आहे. आपल्या मुलांना खऱ्या अर्थाने कसल्या मार्गदर्शनाची गरज आहे हे या मुलाला बघून आपल्याला शिकण्याची गरज आहे.करियर सोबत  जीवन जगण्याची शैली वर किती खोलवर विचार व्यक्त करतांना त्याचा आत्मविश्वास, सखोल अभ्यास, जीज्ञा, चिकाटी व त्याच्या आई वडील व गुरूंची  शिक्षा या ठिकाणी दिसुन येते.

Latest Posts

Don't Miss