Latest Posts

मिजबा प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा द्यावी : मागणीसाठी धरणे निदर्शने

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : ७ फेब्रुवारी २०२५ रोजी महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील करंजनी येथे एक वेदनादायक आणि क्रूर घटना घडली. ४ वर्षीय मिजबा या निष्पाप मुलीवर अमानुष छळ तर झालाच पण तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्याही करण्यात आली.  सर्वात भयंकर घडलेली गोष्ट म्हणजे मिसबाचा मृतदेह एका पेटीत ठेवण्यात आला, यावरून गुन्हेगारांनी गुन्हा करताना कोणत्याही नैतिकतेची आणि मानवतेची पर्वा केली नसल्याचे स्पष्ट केले.

या घृणास्पद कृत्यामुळे संपूर्ण परिसरात शोक, संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजातील प्रत्येक स्तरातून या अत्याचाराविरोधात आवाज उठवला जात आहे. या संतापाला आणि वेदनेला आवाज देण्यासाठी आज बल्लारपूरमध्ये जोरदार निदर्शने करण्यात आले.  वुमन वेलफेअर सोसायटी, बल्लारपूर तर्फे हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी शबाना बाजी, संजीदा बाजी, शाजिया बाजी, आसिया बाजी, शाहीन बाजी, तरन्नुम बाजी, अनिसा बाजी, तबस्सुम बाजी, रुमाना शेख, हुमैरा खान, वहिदा शेख, बिल्कीस शेख, शाजिया यांच्यासह महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

आंदोलनानंतर बल्लारपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात मिजबावर केलेल्या क्रूर गुन्ह्यातील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे. भविष्यात अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी दोषींना फाशीची शिक्षा द्यावी. तसेच मिजबाच्या कुटुंबीयांना योग्य ती आर्थिक भरपाई द्यावी आणि खटल्याचा जलद, निष्पक्ष तपास आणि सुनावणीसाठी जलदगती न्यायालयाची स्थापना करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या दु:खद घटनेतील आरोपींनाही अटक करण्यात आली असून, यावरून या गुन्ह्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.  तरीही, पीडित मिजबाच्या निष्पाप जीवनाची किंमत मोजली गेली आणि समाजात निर्माण झालेल्या भीती आणि संतापाची सीमा नाही.

आंदोलनादरम्यान उपस्थित महिला व नागरिकांनी मिजबाच्या नराधमांना फाशी द्या अशा घोषणा दिल्या. आणि मुलीच्या अश्रूंचा हिशोब हवा, मिजबाला न्याय हवा! हा संघर्ष फक्त मिजबासाठी नाही तर समाजातील प्रत्येक मुलीच्या सुरक्षिततेसाठी आणि सन्मानासाठी आहे.

सदर निवेदन मुख्यमंत्री, गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य तसेच केंद्रीय गृहमंत्री यांना पाठविण्यात आले.

या लढ्यात एकजूट राहून मिजबाला न्याय मिळेपर्यंत आवाज उठवणार असल्याची प्रतिज्ञा वुमन वेल्फेअर सोसायटी बल्लारपूर व उपस्थित नागरिकांनी केली आहे.

Latest Posts

Don't Miss