Latest Posts

विदर्भातील ५७ लाखावर वीजग्राहकांनी केली मोबाईल क्रमांकाची नोंदणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : ग्राहक सुविधांचा लाभ घेण्यासाठी महावितरणच्या नागपूर प्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या विदर्भातील अकराही जिल्ह्यातील तब्बल ५७ लाख ९ हजार ३५७ वीजग्राहकांनी स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची महावितरणकडे नोंदणी केली असून एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत ही टक्केवारी ९१.१३ टक्के आहे. यात नागपूर परिमंडलातील सर्वाधिक १७ लाख ४९ हजार ४१५ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद केली आहे.

नागपूर पाठोपाठ अमरावती परिमंडलातील १२ लाख ८४ हजार ८९०, अकोला परिमंडलातील १२ लाख ६५ हजार ६६, चंद्रपूर परिमंडलातील ७ लाख ५२ हजार ४०३ तर गोंदीया परिमंडलातील ६ लाख ५७ हजार ५८३ ग्राहकांनी त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली आहे. टक्केवारीनुसार विचार करता गोंदीया परिमंडलातील सर्वाधिक ९३.४२ टक्के ग्राहकांनी त्याखालोखाल अकोला परिमंडलातील  ९२.४६ टक्के ग्राहकांनी, नागपूर परिमंडलातील ९१.१३ टक्के ग्राहकांनी, अमरावती परिमंडलातील ९०.४६  तर चंद्रपूर परिमंडलातील ८८.८६ ग्राहकांनी  त्यांच्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे.

महावितरणकडे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करणाऱ्या वीज ग्राहकांना मीटर रिडिंग, वीजबिलाचा तपशील, वीज बंद असण्याचा कालावधी यासह विविध माहिती एसएमएसद्वारे पाठवण्यात येते. ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रीडिंग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट व वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा एसएमएस महावितरणकडून पाठवण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम व बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा एसएमएसग्राहकांना पाठवला जातो. याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना एसएमएस मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीजपुरवठा बंद झाल्यास त्याची माहिती व वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणारा कालावधीची माहिती या सुविधेत मिळते.

ग्राहकाभिमुख सेवांसाठी महावितरणने अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा वापर ग्राहकांनी अधिकाधिक प्रमाणात करावा यासाठी महावितरन सतत्याने पाठपुरावा करीत आहे.  महावितरणकडून वीजग्राहकांना मोबाईल क्रमांक किंवा इमेलची नोंदणी करण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यात महावितरणच्या ९२२५५९२२५५ या क्रमांकावर एसएमएसद्वारे वीजग्राहकांना स्वतःच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय आहे. वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून ९२२५५९२२५५  क्रमांकावर MERG (बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून एसएमएस केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी करता येते. याच पर्यायांचा वापर करीत ग्राहकांना आपल्या बदललेल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी देखील करता येते.

याशिवाय महावितरण कॉल सेंटरच्या १८००२१२३४३५ आणि १८००२३३३४३५  या टोल फ्री या क्रमांकावर देखील ग्राहकाला त्याच्या मोबईल क्रमांकाची नोंदणि करण्याची सुविधा उपलब्ध आहे. कॉल सेंटर व्यतिरिक्त महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपवर देखील मोबाईल क्रमांक नोंद करण्याची सुविधा उपलब्ध असल्याने ग्राहकांनी या सेवेचा लाभ मोठ्या प्रमाणात घेण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss