विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश यु.बी. शुक्ल यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने ०९ डिसेंबर २०२३ रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, १३८ एन.आय. ॲक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन,मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात ०९ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे. तरी सर्वांनी ०९ डिसेंबर २०२३ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली आर.आर. पाटील यांनी केले आहे.