Latest Posts

नवरात्रोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / चंद्रपूर (Chandrapur): आदिशक्तीची आराधना करणाऱ्या नवरात्र आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांना पवित्र बौद्ध धर्माची दिक्षा दिलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या आगमनाला काही दिवसच शिल्ल्क असून हे दोन्ही उत्सव सर्वांना आनंददायी व निर्विघ्न पार पडावेत यासाठी सार्वजनिक उत्सव मंडळांनी धार्मिक उत्सवांसाठी वीजसुरक्षेबाबत गांभिर्याने उपाययोजना करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता हरीश गजबे यांनी केले आहे.

नवरात्रातील रोषणाई, देखावे, मंडप, गरबा महाप्रसाद, रावण दहन तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्याने करण्यात येणारी रोषणाई, भोजनदान व इतर कार्यक्रमासाठी लागणारी वीजव्यवस्था ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता सार्वजनिक २४ तास सुरू असणारे नि:शुल्क क्रमांक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३ यावर संपर्क साधावा अथवा ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल द्यावा. याशिवाय सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिका-यांनी महावितरणच्या संबंधित भागातील अभियंता आणि जनमित्रांचे मोबाईल क्रमांक जवळ ठेवावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

सार्वजनिक उत्सव मंडळांना महावितरणकडून जोडणीसाठी घरगुती वीजदर आकारण्यात येणार आहे. यासाठी मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीजजोडणीसाठी नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्थेची मंडप परवानगी, पोलिस स्थानक परवाना, विद्युत निरिक्षक यांचे वीजसंच सुरक्षित असल्याचे प्रमाणपत्र, वीज मागणी अर्ज, वीजसंच मांडणी चाचणी अहवाल आणि राष्ट्रीयकृत बँक खाते पासबुक छायांकित प्रत इ. कागदपत्रे आवश्यक आहेत.

अनामत रक्कम मिळणार विनाविलंब परत –

तात्पुरत्या वीजजोडणीसाठी मंडळांना मंजूर वीजभारानुसार अनामत रक्कम भरणे आवश्यक आहे. ही रक्कम ऑनलाईन भरल्यास उत्सव संपल्यानंतर वीजबिलाची रक्कम वगळून उरलेली रक्कम विनाविलंब परत केली जाईल. त्यामुळे मंडळांनी अनामत रक्कम ऑनलाईन पद्धतीनेच भरण्याचे आवाहनही महावितरणकडून करण्यात आले आहे

सार्वजनिक सुरक्षा महत्वाची –

 नवरात्रोत्सव, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि इतरही धार्मिक आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ न देता भाविकांना नयनरम्य देखाव्यांचा आनंद घेता यावा यासाठी सार्वजनिक मंडळांनी रोषणाई आणि मिरवणूकीतील देखाव्यांचा परिसरातील विद्युत तारा आणि खांबांना स्पर्श होणार नाही याची खबरदारी घ्यावी.

 गरबा, जागर आदिचे आयोजन विद्युत यंत्रणेपासून लांब अंतरावर करावे.

 दस-या प्रसंगी होणारे रावण दहन हे मोकळ्या मैदानात आणि वीज यंत्रणेपासून लांब करावे, फ़टाक्यांची आतिषबाजी करतांना आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना कराव्यात.

 वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे.

 जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये,.

 वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी.

Latest Posts

Don't Miss