Latest Posts

गडचिरोली जिल्ह्यातील ३५ नवतरुणी करणार हलके मोटार वाहनाचे सारथ्य

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : ग्रामीण विकास मंत्रालय, भारता सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालीत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी ) गडचिरोली येथे महिलांकरीता हलके वाहन चालक तसेच ब्यूटी पार्लर व्यवस्थापन हे दोन्ही निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.

महाराष्ट्रात प्रथमच आरसेटी गडचिरोली ने महिलांकरीता हलके मोटार वाहन चालक प्रशिक्षण हा उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. सध्या महाराष्ट्रात महिला सक्षमीकरण अभियान सुरु असून जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे मार्गदर्शनाखाली आरसेटी गडचिरोली ने हा उपक्रम संपन्न केला याचा मला आनंद होत आहे असे गौरवोद्गार जिल्हा ग्रामीण विकास येत्रणेचे प्रकल्प संचालक प्रशांत शिर्के यांनी केले. ही सुरुवात असून आणखी फार मोठा पल्ला आरसेटीला गाठावयाचा आहे असे सूतोवाच त्यांनी केले. विशेषतः सुशिक्षित बेरोजगार महिलांनी स्वाभीमानाने आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी असा सल्ला सुद्धा त्यांनी दिला. ते आरसेटी गडचिरोली च्या ब्यूटी पार्लर व्यवस्थापन तसेच हलके मोटार वाहन चालक या दोन्ही निवासी प्रशिक्षणाच्या समारोपीय कार्यक्रमात प्रमूख अतिथी म्हणून बोलत होते.

याप्रसंगी परिवहन विभागाचे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले, गौरव सिंह, जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेंभूर्णे, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक नारायण पौनीकर, आरसेटीचे संचालक कैलाश बोलगमवार, आरसेटीचे कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम व पुरुषोत्तम कुनघाडकर, परिक्षक म्हणून लाभलेले पी.डी .काटकर, गुरुदत्त नैताम, संध्या कोतकोंडावार हलके मोटार वाहन चालक प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदशक निलेशकुमार बांबोळे, व दोन्ही प्रशिक्षणातील ७० महिला उपस्थित होत्या.

याप्रसंगी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पवन येवले यांनी प्रशिक्षणार्थी महिलांना विद्यार्थी बनून नवनविन माहिती चे ज्ञान आत्मसात करावे व जबाबदारीने वाहन चालविण्याचा सल्ला दिला. जिल्हा अग्रणी प्रबंधक युवराज टेंभूर्णे यांनी स्वतः सुंदर असायचं आणि दुसऱ्यांना सुंदर करीत रहायचं अशा सूचना दिल्या.

हलके मोटार वाहन चालक प्रशिक्षणार्थी आचल भांडेकर आणि ब्युटी पार्लर प्रशिक्षणार्थी समिक्षा बावणे यांनी आपल्या मनोगतातून महिण्याभर चाललेल्या प्रशिक्षणाचा मागोवा घेतला. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक पुरुषोत्तम कुनघाडकर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यलयीन सहायक अमित आणि पराग यांनी मेहनत घेतली.

Latest Posts

Don't Miss