Latest Posts

चार महिन्यांत काम न करणाऱ्या कंपन्यांना महाऊर्जाची नोटीस

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती (Amravati): मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यामध्ये महाऊर्जाकडून आजतागायत ४९८ विविध क्षमतांचे सौर कृषिपंप व धारणी तालुक्यामध्ये १३१ विविध क्षमतांचे सौर कृषिपंप आस्थापित व कार्यान्वित करण्यात आले असल्याचे मेडाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

चिखलदरा तालुक्यात १८ पंपांचे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात आले, तर संबंधित कंपन्यांना अल्टिमेटम देत नोटीस बजावण्यात आल्या आहेत. चिखलदरा तालुक्यातील १३२ सौर कृषिपंप तसेच धारणी तालुक्यातील ३७ सौर कृषिपंप आस्थापनांचे काम प्रगतिपथावर असून, लाभार्थ्यांना सौर कृषिपंप साहित्य प्रकल्पस्थळी पोहोचविण्याचे काम सुरू आहे. लाभार्थ्यांनी सौर पुरवठादाराची निवड केल्यानंतर चार महिन्यांमध्ये सौर पंप कंपन्यांना आस्थापित करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रगतिपथावर काम असल्याचे मेडाचे विभागीय महाव्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी पत्रात स्पष्ट केले.

विलंब करणाऱ्या कंपन्यांना नोटीस –

अमरावती जिल्ह्यात सौर पंप आस्थापित करण्यास विलंब करणाऱ्या कंपन्यांना महाऊर्जा मुख्यालयातर्फे तसेच या कार्यालयातर्फे नोटीस, पत्रे देण्यात आलेली असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांचे काम इतर कंपन्यांना वळते करण्याविषयी मुख्यालयास या कार्यालयातर्फे शिफारस करण्यात आली असल्याचे प्रफुल्ल तायडे यांनी पत्रात स्पष्ट केले.

कंपन्यांची घेतली आढावा बैठक –

विभागात काम करणाऱ्या संपूर्ण कंपन्यांची आढावा बैठक ८ नोव्हेंबर ला घेण्यात आली. ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण प्रलंबित कामाचा निपटारा करण्याविषयी सक्त सूचना त्यामध्ये देण्यात आल्या आहेत. प्राप्त सर्व तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तांत्रिक अधिकाऱ्यांनी तत्काळ शेतकऱ्यांशी संपर्क करावा, असे आदेशही देण्यात आले आहेत.

Latest Posts

Don't Miss