Latest Posts

आता बल्लारशाह वरून थेट मुंबई करीता रेल्वेगाडी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारशाह ते मुंबई ही नंदीग्राम एक्स्प्रेस लवकरच दररोज धावणार आहे. तर काझीपेठ ते पुणे ही रेल्वे आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. याचा फायदा मुंबई, पुण्याकडे जाणारे प्रवासी, उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी व नोकरदार वर्गांना होणार आहे.

बल्लारशाह ते मुंबई व पुणे थेट रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी व व्यापारी, कॅन्सरग्रस्त रुग्ण व इतर रेल्वे प्रवाशांना अन्य पर्यायाने किंवा नागपूरहून रेल्वेने प्रवास करावा लागत होता. त्यामुळे बराच वेळ व आर्थिक भूर्दंड सोसावा लागत होता. मागील काही दिवसांपासून रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत होती. त्यातून बल्लारशाह ते मुंबई किंवा पुणे थेट रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली होती. दरम्यान राष्ट्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी या मागणीची गांभीर्याने दखल घेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची दिल्लीत भेट घेतली. बल्लारशाह ते मुंबई व पुणे थेट रेल्वे सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. ज्यात त्यांना यश आले आहे.

१२ फेब्रुवारी रोजी यासंबंधी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना पत्रातून सूचना केल्या आहे. अहिर यांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना काझीपेठ, पुणे गाडी क्र.२२१५१/५२ बल्लारशाह येथून सुरू करण्याची मागणी केली. तसेच नंदीग्राम एक्स्प्रेस क्रमांक ११४०१/०२ मुंबईच्या पलीकडे आदिलाबाद ते बल्लारशाहपर्यंत वाढविण्याची मागणी केली होती. नंदीग्राम गाडी आता या मार्गावर भद्रावती, वणी, पिंपळखुटी येथे थांबणार आहे. याबाबत मध्य रेल्वे विभागाने वरील पत्र विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना दिले आहे. या पत्रानुसार बल्लाशाह ते मुंबई या गाड्या दररोज आणि पुण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस धावतील. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

Latest Posts

Don't Miss