Latest Posts

हत्तींच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून मध्यरात्री पाच कुटुंबे सैरावैरा : डोक्यावरचे छत गेले, पण जीव थोडक्यात वाचला 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : मध्यरात्री भरझोपेत घरावर हत्ती आले. धडकेने घर हलले, भांडी कोसळली हत्तींच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून पाच कुटुंबे जीवाच्या भीतीने घर- संसार सोडून मागच्या दाराने सैरौवैरा धावली. त्यामुळे जीव तर वाचला, पण या कुटुंबांवर उघड्यावर येण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढावला. सदर घटना आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथे २४ डिसेंबरच्या रात्री हा थरार घडला.

गोंदियाकडे वळलेल्या रानटी हत्तींचा कळप पुन्हा माघारी फिरला असून पाथरगोटा (ता.आरमोरी) येथे मध्यरात्रीनंतर २० ते २२ रानटी हत्ती पाच घरांवर चाल करुन आले. सुरुवातीला अशोक वासुदेव राऊत यांच्या घराच्या दरवाजाला ठोक दिली. हत्तीची किंचाळी ऐकून घरातील सर्व सदस्य उठून घराच्या मागच्या दरवाज्याने पळ काढला आणि मोठ्याने आरडाओरड करून शेजाऱ्यांना जागे केले. त्यामुळे या परिसरातील घरातील सर्व सदस्य जीव मुठीत घेऊन घराबाहेर सुसाट धावले. अशोक राऊत, सूरज दिघोरे, मंगला प्रधान ,चंद्रशेखर बघमारे, दुर्गादास बघमारे यांच्या घरांचीही हत्तींनी नासधूस केली. यानंतर संपूर्ण गाव जागे झाले, पण जीवाच्या भीतीने कोणीही घराबाहेर पडले नाही. गावकऱ्यांनी वनविभागाला कळविले. त्यानंतर सह वनपरक्षेत्र अधिकारी अविनाश मेश्राम, वनपाल मुखरु किनेकर, वनरक्षक बाळू शिऊरकर, रुपा अत्करे, पंढरी तेलंग आदी दाखल झाले. हुल्ला पार्टीच्या मदतीने हत्तीच्या कळपाला हुसकावून लावले. घरांचे नुकसान झाले, पण जीवितहानी टळली.

पाच कुटुंबांना निवाऱ्याची व्यवस्था करावी –

दरम्यान, हत्तीच्या हल्ल्यामुळे पाच कुटुंबांसमोर जायचे कोठे, रहायचे कसे, खायचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांना तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करुन भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

यापूर्वी शंकरनगर येथे ९ सप्टेंबर रोजी हत्ती पहिल्यांदा दाखल झाले आणि शेतकऱ्यांच्या शेतातील धान्यांसह बोअरवेल, इलेक्ट्रिक साहित्यांचे नुकसान केले होते. आता पुन्हा एकदा या भागात हत्तींनी एन्ट्री केल्याने शेतकरी हादरले आहेत.

Latest Posts

Don't Miss