Latest Posts

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट : पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतीक्षा

– शेतकऱ्याचे डोळे आभाळाकडे

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : बल्लारपूर तालुक्यातील कृषी क्षेत्र कोरडवाहू आहे. शेतकऱ्यांनी मशागत करून खरीप हंगामाची तयारी केली. मात्र मृग नक्षत्र संपून देखील पावसाने जोरदार हजेरी लावली नाही. त्यामुळे धूळपेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे. अन्य पिकांच्या पेरणीसाठी तालुक्यातील बहुतांश शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

बल्लारपूर तालुक्यात एकूण खरीप हंगामाचे कृषी क्षेत्र ७ हजार १९२ हेक्टरवर निर्धारित केले आहे. बळीराजाचा खरीप हंगाम निसर्गाच्या जलचक्रावर अवलंबून आहे. शेतकरी प्रामुख्याने भात, कापूस, सोयाबीन, तूर व अन्य कडधान्य पिकाची लागवड करतात. तालुक्यात जवळपास ४ हजार हेक्टरवर बी- बियाण्यांची तजवीज शेतकऱ्यांनी करून ठेवली आहे. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे त्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

बल्लारपूर तालुक्यात भात पिकाचे पेरणी क्षेत्र २ हजार ८५४ हेक्टर आहे. तर कापूस पिकाचे कृषी क्षेत्र ३ हजार ६६५ हेक्टर आहे. सोयाबीन पीक १ हजार हेक्टर लागवडीसाठी निर्धारित आहे. तूर इतर कडधान्य व भाजीपाला पिकांचे ४५० हेक्टर कृषी क्षेत्र आहे. बल्लारपूर तालुक्यात सिंचन सुविधा नाही. त्यामुळे बळीराजाला पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. परंतु, तालुक्यात अद्यापही जोरदार पाऊस न पडल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

Latest Posts

Don't Miss