– पंतप्रधान नरेंद्र मोदी देशास संबोधित करणार
– विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : १९ फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करण्यात येणार असून त्यानिमित्ताने शहरात जय शिवाजी जय भारत पदयात्रेचे आयोजन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या कार्यक्रमास शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी केले आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी दूरदृष्यप्रणालीद्वारे देशास संबांधित करणार आहेत असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात त्यासंदर्भात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
या पदयात्रेत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. यासाठी केंद्र सरकारच्या माय भारत पोर्टलवर (mybharat.gov.in) नोंदणी करण्यात यावी. नोंदणी केलेल्या युवक युवतींनी १९ फेब्रुवारी बुधवारला सकाळी ७ वाजता उपस्थित रहायचे आहे. सकाळी ७.३० वाजता उद्घाटन होणार आहे.
पदयात्रेचा शुभारंभ सर्कस मैदान, रामनगर येथून होणार आहे. यादरम्यान विविध चौकात मल्लखांब, दाडपट्टा, कुस्ती, आदिवासी नृत्य, योग, लेझिम पथक, पारंपारिक पोषाखातील मुले, स्वच्छता अभियान, समुहगानाचे आयोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. या पदयात्रेदरम्यान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था तसेच आरोग्यासाठी ॲम्ब्युलंसची सुविधा करण्यात यावी. पोलीस विभागाने या दरम्यान वाहतूक व्यवस्था चोख ठेवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी संबंधितांना दिले.
सर्कस मैदान, गजानन चौक, वंजारी चौक, राजकला टॉकीज चौक, शास्त्री चौक, पँथर चौक, जसवंत टॉकीज चौक अशा मार्गाने पदक्रमन करून पदयात्रेचा समारोप सर्कस मैदानावर होणार आहे. त्यानंतर सकाळी ९.३० वाजता पंतप्रधान शिव जयंतीनिमित्त देशास संबोधित करतील. तरी या पदयात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.