Latest Posts

एक रुपयांत प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा : जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे शेतकऱ्यांना आवाहन

– अंतिम मुदत १५ जुलैपर्यंत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : विविध नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टीकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप हंगाम २०२४ करिता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना केवळ १ रुपयामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी केवळ १ रुपये प्रती अर्ज एवढी रक्कम भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शेतकऱ्यांना केले आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२४ आहे.

केंद्र शासनाच्या कप ॲन्ड कॅप मॉडेल (८०: ११०) नुसार ही योजना खरीप हंगाम २०२३ ते रब्बी  हंगाम २०२५-२६ या तीन वर्षाकरिता अधिसुचित पीकांसाठी विमा क्षेत्र घटक धरून सर्वसमावेशक पीक विमा योजना’ राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्यांपर्यंत असणार आहे. यापेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहे. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के आहे.

योजना कार्यान्वयीन यंत्रणा : चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगाम २०२४ करीता ओरिएन्टल इन्शुरन्स कं.लि. नेमण्यात आली आहे. केंद्र शासनाच्या पीक विमा पोर्टलचा टोल फ्री क्रमांक १४४४७ हा असून पीक विमा कंपनीचा ई-मेल pmfby.१८००००@orientalinsurance.co.in हा आहे.

विमा योजनेत सहभागी होण्याकरीता : इतर बिगर कर्जदार शेतक-याने आले आधारकार्ड, ७/१२ उतारा, बँक पासबुक, पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र घेऊन प्राधिकृत बँकेत विमा अर्ज द्यावा व हप्ता भरून सहभाग घ्यावा. हप्ता भरलेली पोच पावती जपून ठेवावी. कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी), आपले सरकार सेवा केंद्राच्या मदतीने विमा योजनेत सहभागी होता येते त्यासाठी www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेऊ शकता.

विमा संरक्षित रक्कम : खरीप २०२४ करीता चंद्रपूर जिल्ह्यासाठी पीकनिहाय निश्चित करण्यात आलेली विमा संरक्षित रक्कम पुढीलप्रमाणे आहे. ज्वारी २८ हजार रुपये, सोयाबीन ५२ हजार ७५० रु., मुग २५ हजार ८१७ रु., उडीद २६ हजार २५ रु., तूर ३६ हजार ८०२ रु., कापूस ५५ हजार ७५० रु. आणि भात ४७ हजार ७५० रुपये आहे.

पीक विमा योजनेंतर्गत या जोखमींचा समावेश : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुढील कारणांमुळे शेतक-यांना टाळता न येण्याजोगे कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल. तसेच हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी/लावणी/ उगवण न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पेरणी / लावणी न झालेले क्षेत्र हे सर्वसाधारण पेरणी क्षेत्राच्या ७५ टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास विमा संरक्षण देय राहील.

पिकांच्या हंगामातील प्रतिकृल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान : हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत, मात्र सर्वसाधारण काढणीच्या १५ दिवस आधीपर्यत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबीमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये मागील लगतच्या ७ वर्षाच्या सरासरी उत्पादनाच्या ५० टक्के पेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर अधिसुचित क्षेत्रस्तरावर विमा संरक्षण देय राहील.

पीक पेरणीपासून काढणी पर्यतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी : दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, किड व रोगांचा व्यापक प्रार्दुभाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट, आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकाच्या उत्पादनात येणाच्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल.

स्थानिक नैसर्गिक आपत्ती : या बाबी अंतर्गत गारपीट, भुस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निकश्चित करण्यात येईल.

काढणी पश्चात नुकसान : कापणी / काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या पिकाचे काढणीनंतर २ आठवड्याच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्ति स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्ति केली जाईल.

नुकसान भरपाई मिळण्यासाठी : नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे अकस्मात नुकसान झाल्यास तसेच काढणीपश्चात नुकसान झाल्यास घटना घडल्यापासून ७२ तासांच्या आत याबाबत, विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी सर्व्हे नंबर नुसार सर्वप्रथम केंद्र शासन पीक विमा योजना ॲप (Crop insurance App) चा वापर करावा. तसेच संबंधित विमा कंपनी , संबंधित बँक, कृषी / महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक याद्वारे कळविण्यात यावे. तसेच नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्राचा तपशील कळविणे बंधनकारक आहे. विमा योजनेत सर्वप्रकारची नुकसान भरपाई रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. त्यामुळे बँक खाते योग्य नोंदवावे.

महत्वाच्या नवीन बाबी : या योजनेत जे पीक शेतात लावले आहे, त्याचाच विमा घ्यावा. शेतात विमा घेतलेले पीक नसेल तर विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागेल. या योजनेत सहभागी होण्याकरिता ई-पीक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद ई-पीक पाहणी मध्ये वेळेवर करावी. भाडे कराराद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना नोंदणीकृत भाडे करार प्रत पीक विमा पोर्टल वर अपलोड करावी लागेल.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सन २०२३-२४ या वर्षात ३ लक्ष ५० हजार ९६९ शेतकऱ्यांनी सहभाग घेवून ३ लक्ष २७ हजार ९०१ हे. क्षेत्र विमा संरक्षित केले होते. त्या अनुषंगाने एकूण ९१६२.९२ लक्ष रकमेचा विमा संबंधित शेतकयांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे.

सद्यस्थितीत प्रधानमंत्री पीक विमा योजना सन २०२४-२५ अंतर्गत केवळ १ रुपया प्रति शेतकरी या दराने जिल्ह्यातील ५ हजार ८७८ शेतकऱ्यांनी १० हजार ४९३ अर्जाव्दारे सहभाग नोंदविलेला आहे. या योजनेंतर्गत नोंदणीची अंतिम मुदत १५ जुलै, २०२४ पर्यंत असल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याकरीता आपल्या नजिकच्या बँक शाखेत तसेच आपले सरकार सेवा केंद्रामध्ये विहीत मुदतीत विमा हप्ता भरून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी केले असून या योजनेबाबत अधिक माहितीसाठी क्षेत्रीय स्तरावरील मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडे संपर्क करावा.

Latest Posts

Don't Miss