विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : आधुनिक संत्रा प्रक्रिया उभारणी योजनेअंतर्गत प्राथमिक प्रक्रिया केंद्र उभारण्यासाठी प्रस्ताव मागविण्यात येत आहे. प्रस्तावाकरीता निविदा तसेच मॉडेल प्रकल्प अहवाल महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाच्या www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला असून अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत १७ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे.
राज्य शासनाने राज्यातील नागपूर, काटोल व कळमेश्वर जि. नागपूर, मोर्शी जि. अमरावती व संग्रामपूर जि. बुलढाणा येथे आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे या योजनेस शासन निर्णयान्वये मान्यता देवून २० कोटी रुपये निधीची तरतुद करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबाजवणीकरीता महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे यांची नियुक्ती करणेत आलेली आहे. योजनेच्या लाभार्थीमध्ये सहकारी प्रक्रिया संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट, खाजगी उद्योजक आणि बाजार समिती यांचा समावेश आहे. प्राथमिक प्रक्रिया प्रकल्पात पॅक हाऊस, संत्रा ग्रेडींग लाईन, प्रिकुलिंग, कोल्ड स्टोअरेज इत्यादी सुविधांचा समावेश असुन अंदाजित खर्च ४ कोटी रुपये अपेक्षीत आहे. या योजनेंतर्गत या प्रकल्पाकरीता प्रथमतः लाभार्थ्यांनी १५ टक्के स्वनिधी व उर्वरित ८५ टक्के निधी बँकेकडून कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन प्रकल्प उभारणी पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला प्राप्त झाल्यानंतर शासनाकडून प्रकल्पाच्या अंदाजित किंमतीच्या ५० टक्के मर्यादेपर्यंतचे किंवा कमाल रक्कम २ कोटी अनुदान देण्यात येणार असुन हे अनुदान लाभार्थीच्या कर्ज खाती जमा करण्यात येईल.
या योजनेचा लाभ संबंधित तालुक्यातील जास्तीत जास्त लाभार्थीनी घ्यावा, असे आवाहन महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ विभागीय उपसरव्यवस्थापक अजय कडू यांनी केले आहे.