Latest Posts

अजब-गजब विचार मंच दिवाळी संध्या मैफिल २०२३ पहाट स्वरांच्या दिव्याची पर्व – १०

– कार्यक्रमात गीत सादर करताना पं. गुणवंत घटवाई.
– दीपावली सांध्य मैफलीने उधळले सुरांचे लख्ख चांदणे
– रसिकांनी घेतला मनमुराद आनंद; गतकाळातील हिंदी गीतांनी दिला आठवणींना उजाळा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : प्रकाश पर्व दीपावलीच्या पहिल्या दिवसाची अर्थात वसुबारसेची सांज अवतरली ती सुमधुर सुरांचा नजराणा घेऊनच. अजब-गजब विचार मंचाची मागील दहा वर्षांची परंपरा असलेल्या या दीपावली सांध्य मैफलीत सप्तसुरांचे लख्ख चांदणेच उधळण्यात आले. या सूरचांदण्यात नाहताना गडचिरोलीकर रसिकांनी या  सूरमयी मैफलीचा मनमुराद आनंद घेतला.

आपल्या विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या अजब-गजब विचार मंचाच्या वतीने यंदाही दीपावलीनिमित्त सप्तसुरांची मेजवानी देण्यात आली. विशेष म्हणजे यंदा एक संध्याकाळी व एक पहाटे अशा दोन स्वरमैफलींची मेजवानी रसिकांना मिळाली. सप्तसुरांचा हा डबल धमाका अवघी गडचिरोली नगरीच सूरमयी करणारा ठरला.

यंदाच्या संगीत महोत्सव – २०२३अंतर्गत पहिल्या सांध्य मैफलीत ६०, ७०, ८० च्या दशकातील अवीट गोडीच्या हिंदी गीतांचा नजराणा पेश करण्यात आला. स्थानिक विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित या मैफलीचा प्रारंभ शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामवंत पं. गुणवंत घटवाई यांनी ‘वक्रतुंड महाकाय’, या गणेश स्तवनाने केला. त्यानंतर गायक सारंग जोशी यांनी ‘शिर्डीवाले साईबाबा आया है तेरे दर पे सवाली’ ही कव्वाली सादर करत मैफलीवर सुरांचे गारुड घातले. त्यानंतर गायिका श्रेया खराबे-टांकसाळे यांनी ‘रात का समाॅं झुमे चंद्रमा’ गाताच अनेक रसिक बाॅलीवुडमधील बहारदार गीतांच्या सुवर्णकाळातच पोहोचले. मुकूल पांडे यांनी गायलेलं ‘मै जिंदगीका साथ निभाता चला गया’ हे गीत स्वर्गीय मोहम्मद रफी यांची आठवण जागवून गेलं, गायिका राधा ठेंगडी यांनी ‘पिया तोसे नैना लागे रे’ गात पुन्हा सुरांची पखरण केली.

गडचिरोलीचीच सुपुत्री शास्त्रीय गायिका निकीता चंदनखेडे हिच्या ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’, या गीतातील आर्त स्वरांनी रसिकांना व्याकुळ केलं. त्यानंतर सादर झालेली ‘गाता रहे मेरा दिल’, ‘छुप गये  सारे नजारे ओय क्या बात हो गई’, ‘हसता हुवा नुरानी चेहरा’ हे द्वंद्व गीत, ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’ या जुन्या गीतासह अलीकडच्या काळातील ‘हवा के झोंके आज मौसमों से रूठ गए’ हे सुमधुर गीतही सादर झाले. शिवाय जीवनाची नश्वरता प्रभावीपणे कथन करणारी ‘चढता सुरज धीरे धीरे ढलता है ढल जाएगा’ ही कव्वालीही सादर झाली.पं. गुणवंत घटवाई यांनी उत्तरार्धात अतिशय मिष्कीलपणे गायलेल्या ‘ओ मेरी जोहराजबी’ या गीतानेही रंगत आणली. ६०, ७० च्या दशकातील काही गीतांच्या दोन ते चार ओळी गात सुरांचा गुलदस्ताच रसिकांच्या हाती देत या मैफलीची सांगता झाली. या मैफलीला प्राचार्य डाॅ. राजाभाऊ मुनघाटे, शमशेर खान पठाण, प्राचार्य लीना हकीम, डाॅ. मिलिंद नरोटे, अरविंद कात्रटवार, संतोष तंगडपल्लीवार, रवी वासेकर,राजू बोमनवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.या मैफलीसाठी अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, सतीश विधाते, नंदकिशोर काथवटे, विश्राम होकम, सुभाष धंदरे, मिलिंद उमरे, सूरज खोब्रागडे, प्रवीण खडसे, दत्तू सूत्रपवार, डॉ. प्रशांत चलाख, प्रतीक बारशिंगे आदींनी सहकार्य केले.

बत्ती गुल तरी हाऊसफुल्ल…
गुरुवारी सायंकाळी दीपावली सांध्य मैफलीला प्रारंभ झाला. गणेश स्तवन, शिर्डीवाले साईबाबा या गीतांनी उत्तम वातावरण निर्मिती केली. रसिक सुरानंदात असताना श्रेया टांकसाळे यांनी ‘रात का समाॅं’  गायला सुरुवात केली आणि त्या अंतऱ्या पोहचत नाही तोच अचानक वीजपुरवठा खंडीत झाला. जवळपास अर्धा तास आयोजक तांत्रिक दोष दूर करण्याची खटपट करत होते. पण रसिकांनी आपली जागा अजिबात सोडली नाही. बत्ती गुल झाली असली, तरी मैफलीतील गर्दी हाऊसफुल्ल होती. तांत्रिक दोष दूर होऊन वीजपुरवठा सुरू होताच पुन्हा मैफलीत सुरांची उधळण सुरू झाली.

 

Latest Posts

Don't Miss