– केंद्र सरकारने दिला इशारा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : भारताने डिजिटल क्रांतीच्या दृष्टीकोनातून आणखी एक पाऊल टाकले आहे. केंद्र सरकारने नुकतेच पॅन २.० प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या योजनेतंर्गत लोकांना नवीन QR कोड असलेले पॅन कार्ड जारी केले जाणार आहे. PAN २.० चा उद्देश पॅन कार्डशी संबंधित घोटाळे थांबवणे हा आहे. यासोबतच पॅन जारी करणारी यंत्रणा आधुनिक करण्यासाठी हे केले जात आहे. याशिवाय, नवीन पॅन कार्ड जारी केल्याने डुप्लिकेट पॅन कार्ड ओळखण्यास मदत होणार आहे. पॅन २.० जारी झाल्यानंतर, ज्यांच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड असल्याचे आढळून येईल त्यांना मोठा दंड भरावा लागेल.
डुप्लिकेट पॅन कार्ड म्हणजे काय?
प्राप्तिकर कायदा १९६१ च्या तरतुदींनुसार, एखादी व्यक्ती फक्त एकच पॅन कार्ड ठेवू शकते. एखाद्या व्यक्तीकडे १ पेक्षा जास्त पॅनकार्ड असल्यास, त्याला ते संबंधित अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल. तसेच अतिरिक्त पॅन कार्ड निष्क्रिय करावे लागेल. २ पॅनकार्ड असलेल्या लोकांनी तसे न केल्यास आणि दुसरे पॅनकार्ड विभागाच्या निदर्शनास आले तर अशा लोकांना दंड भरावा लागू शकतो.
वित्त मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की पॅन २.० च्या माध्यमातून डुप्लिकेट पॅन ओळखण्यासाठी चांगले तंत्रज्ञान वापरले जाईल. यामुळे एका व्यक्तीकडे एकापेक्षा जास्त पॅन असण्याचे प्रमाण कमी होईल. म्हणजेच डुप्लिकेट पॅन पूर्णपणे काढून टाकण्याचा सरकारचा उद्देश आहे.
डुप्लिकेट पॅन कार्ड धारकास होणार १० हजार रुपये दंड –
जर कोणत्याही व्यक्तीने आयकर विभागाला त्याच्या डुप्लिकेट पॅन कार्डबद्दल माहिती दिली नाही, तर आयकर कायद्याच्या कलम २७२B अंतर्गत प्राप्तिकर विभागाकडून १० हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल. अशा परिस्थितीत, जर तुमच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड असेल, तर तुम्ही डुप्लिकेट पॅन कार्ड सबमिट करण्यासाठी NSDL किंवा UTIITSL सारख्या पॅन सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे आवश्यक फॉर्म दाखल करू शकता. डुप्लिकेट पॅन कार्ड सबमिट करण्यापूर्वी, तुमचे वैध पॅन कार्ड तुमच्या आधारशी लिंक केले आहे, याची खात्री करा.