विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर पक्ष संघटन आणि जनहिताच्या मुद्द्यावर संघर्ष उभा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील जिल्ह्यातील पक्षाचे पदाधिकारी आणि विविध सामाजिक प्रतिनिधी, फुले- आंबेडकरी कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
सदर बैठकीला मुख्य मार्गदर्शक म्हणून पक्षाचे संस्थापक अध्यक्ष ॲड. डॉ. सुरेश माने उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे विदर्भ अध्यक्ष विशेष फुटाणे, शेकापचे जिल्हा चिटणीस रामदास जराते, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. उज्वला शेंडे, तारका भडके, युवा नेते विनोद मडावी, कुणाल कोवे, बीआरएसपी चे महासचिव भास्कर बांबोळे, संजय मगर, महिला सहसंयोजिका पूनम घोनमोडे उपस्थित होते.
सध्याच्या राजकारणात देशात आणि राज्यात रिपब्लिकन- बहुजन राजकारणाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आंबेडकरी जनतेने अतिशय गंभीर होऊन सामाजिकच नव्हे तर राजकीय स्तरावर आंबेडकरी ताकद उभी करुन मताच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकविण्यासाठी आंबेडकरी जनतेने काम करणे अत्यावश्यक असल्याचे सांगून याकरिता गडचिरोली मध्ये बीआरएसपीच्या वतीने २५ फेब्रुवारी रोजी आंबेडकरी कार्यकर्ता महामेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचा निर्धार डॉ. सुरेश माने यांनी जाहीर केला.
देशातील वातावरण सध्या संविधान विरोधी आणि हुकूमशाहीकडे वाटचाल करीत असल्याने देशाचे सार्वभौमत्व अबाधित ठेवण्यासाठी सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्यांनी राजकारणात उतरण्याची गरज असल्याचे तारका भडके यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा प्रभारी राज बन्सोड, संचालन प्रतीक डांगे तर आभार जिल्हाध्यक्ष मिलिंद बांबोळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पुरुषोत्तम रामटेके, अरविंद वाळके, जितेंद्र बांबोळे, सतीश दुर्गमवार, संगरक्षित बांबोळे, हेमंत रामटेके, प्रफुल रायपुरे, उर्मिला वाळके, विद्या कांबळे, सविता बांबोळे, प्रीती इंगळे, प्रफुल रायपुरे, देवा वनकर, हेमंत नैताम, कमलेश रामटेके, पियुष वाकडे, सचिन बनसोड, धम्मदीप बारसागडे, चंद्रकांत रायपुरे, प्रकाश बन्सोड, पुरुषोत्तम बांबोळे आदीनी सहकार्य केले.