विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli): विधानसभा निवडणुकीकरिता मतदान अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची द्वितीय सरमिसळीकरणाची (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. ६७- आरमोरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक विनित कुमार, ६८- गडचिरोली निवडणूकनिरीक्षक राजेंद्र कुमार कटारा, जिल्हा निवडणूक अधिकारी संजय दैने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, नोडल अधिकारी शेखर शेलार, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी संजय त्रिपाठी आदी यावेळी उपस्थित होते.
मतदान केंद्राध्यक्ष, सहायक केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक २ व मतदान अधिकारी क्रमांक ३ यांची सरमिसळ प्रक्रिया जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यात १० टक्के अधिकाऱ्याची अतिरिक्त निवड करण्यात आली आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात ३१० मतदान केंद्रासाठी ३४६ मतदान पथके, गडचिरोली विधानसभा मतदार संघात ३६२ मतदान केंद्राकरिता ४०३ मतदान पथके आणि अहेरी विधानसभा मतदार संघाकरिता ३०० मतदान केंद्रासाठी ३३५ मतदान पथके असे जिल्ह्यात एकूण ९७२ मतदान केंद्रासाठी १ हजार ८४ पथके पथकांची निवड करण्यात आली. एका पथकात ४ अधिकारी राहतील. आरमोरी क्षेत्राकरिता १ हजार ३७६ पुरूष, ८ महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. गडचिरोली क्षेत्राकरिता १ हजार ६०४ पुरूष व ८ महिला तर अहेरी विधानसभा क्षेत्राकरिता १ हजार ३३२ पुरूष व ८ महिला मतदान अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.