विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : माडिया, कोलाम व कातकरी या आदिम जमाती समुहाच्या सहभागी पध्दतीने विकासाच्या प्रवाहात आणणे आणि विकासाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी आदिम जमाती समुहाच्या समावेश विकासासाठी दोन ग्रामसाथीची नियुक्ती व कार्यालयासाठी एक समन्वयक पद भरती करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील कुंनघटकर ले-आऊट वर्धा व देवळी तालुक्यातील कोल्हापूर येथे प्रत्येकी एक ग्रामसाथीची निवड करण्यात येणार आहे. तसेच आदिवासी विभागामार्फत आदिम जमातीसाठी सुरु करण्यात आलेले कार्यक्रम, योजनांची नियोजनप्रमाणे अंमलबजावणी होत आहे, याची खात्री करणे, त्याचा नियमित आढावा घेणे, मुल्यमापन व सनियंत्रणे करणे, नवीन योजनांसाठी संशोधनासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ स्वतंत्र कक्ष उभारणे या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या योजनेमधुन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासाठी प्रकल्प समन्वयक पद भरण्यात येणार आहे.
ग्रामसाथी पदासाठी उमेदवार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलेला असावा. त्याचे वय १८ ते ३५ वर्ष दरम्यान असावे. उमेदवारांना माडीया, कोलाम कातकरी या आदिम जमाती समुहांसोबत समुहांशी संबंधित विकास कामे केल्याचा किमान १ वर्षाचा अनुभव असावा व उमेदवार आदिम जमातीचा असावा. ज्या गाव समुहांचे ग्रामसाथी पद रिक्त आहे त्याच गाव समुहांतून पात्र उमेदवारांचे अर्ज प्राप्त करुन घेण्यात येईल. प्राप्त अर्जाची छाननी करुन एका उमेदवारांची बाह्यस्त्रोत यंत्रणेकडे नियुक्तीसाठी शिफारस करण्यात येईल.
प्रकल्प समन्वयकासाठी उमेदवार आदिम जमातीचा असावा. उमेदवाराचे किमान पदवीपर्यंत शिक्षण झाले असावे. कमाल पदव्युत्तर पदवी शिक्षण असणे योग्य राहील. एमएसडब्ल्यू व बीएसडब्ल्यू सामाजिक शास्त्र व तत्सम सामाजिक कार्यक्रम अभ्यासक्रमास प्राधान्य राहील. वंचित समाजाच्या विकासासाठी कार्यक्रम राबविण्याचा १ ते २ वर्षाचा अनुभव असावा, आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी यांनी कळविले आहे.
दोनही पदाच्या नियुक्तीसाठी २५ ऑगस्ट पर्यंत एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयास आवश्यक कागदपत्रास अर्ज सादर करावे, प्रकल्प अधिकारी दिपक हेडाऊ यांनी कळविले आहे.