Latest Posts

अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतमालाच्या नुकसानाची माहिती तात्काळ द्या

– कृषी विभागाचे सहभागी शेतकऱ्यांना आवाहन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : जिल्हयात २६ ते २९ नोव्हेंबर दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे खरीप व रब्बी पिकांना फटका बसला असून पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असल्यास, योजनेत समाविष्ठ नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान या जोखमेच्या बाबीअंतर्गत नुकसानीची पूर्वसूचना जिल्हयासाठी नियुक्त ओरीऐंटल इन्शुरन्स या पीकविमा कंपनीस घटना घडल्यापासून ७२ तासात द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने शेतक-यांना केले आहे.

सद्या खरीप हंगामातील भात व कापूस पीक काढणीच्या अवस्थेत तर बऱ्याच ठिकाणी भात पीक कापणी होऊन सुकवणीकरीता शेतात पसरविलेल्या अवस्थेत आहे. तर काही ठिकाणी मळणीच्या अवस्थेत आहे. तसेच कापूस परिपक्वतेच्या व वेचणीच्या अवस्थेत आहे. ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढया बांधून सुकवणी करणे आवश्यक असते, अशा कापणी/ काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवडयांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांच्या अधिन राहून नुकसान भरपाई निश्चित केली जाते. शेतकऱ्यांनी नुकसान कळवितांना सर्व्हे नंबर व नुकसानग्रस्त क्षेत्र तपशील कळविणे बंधनकारक राहील.

योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी नुकसानाची माहिती संबंधित विमा कंपनी, संबंधित बँक, कृषी/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांकाव्दारे देण्यात यावी. सर्वप्रथम पीक विमा ॲपचा वापर करावा. नंतर संबंधित विमा कंपनीच्या टोल-फ्री क्रमांकाचा वापर करावा. टोल-फ्री क्रमांकावर फोन न लागल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे तालुका, जिल्हास्तरीय कार्यालय किंवा कृषी व महसूल विभागाला द्यावी.

शेतकरी टोल-फ्री क्रमांक/ई-मेलवर नुकसानीची पुर्वसूचना देवू शकतील :

ओरीऐंटल इन्शुरन्स पीक विमा कंपनीच्या १८००११८४८५ या टोल-फ्री क्रमांकावर, ई-मेल pmfby.१६००००@orientalinsurance.co.in अथवा विमा कंपनीच्या लिंकवर https://orientalinsurance.org.in/pm-fasal-bima?isRefresh=true या तीनही पर्यायाव्दारे पुर्वसूचना देता येईल. पुर्वसूचना न देता आल्यास आपल्या कार्यक्षेत्रातील कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक यांचेशी संपर्क करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात जावून नुकसानीची लेखी स्वरुपात माहिती द्यावी.

शेतकऱ्यांनो… प्रधानमंत्री पीक विमा योजनेतंर्गत रब्बी हंगामात व्हा सहभागी : प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना ऐच्छिक आहे. रब्बी हंगाम योजना २०२३ अंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना सहभाग घेण्याची अंतिम मुदत ज्वारी पिकांकरीता ३० नोव्हेंबर तर गहु (बा.) व हरभरा पिकाकरीता १५ डिसेंबर, २०२३ आहे. खरीप हंगामाप्रमाणेच रब्बी हंगामात सुध्दा शासनाने प्रती अर्ज केवळ १ रुपया भरून शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी होण्याकरीता खास सवलत ठेवली आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रात,अधिसूचित पिके घेणारे (कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह) सर्व शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. यामुळे खरीप प्रमाणेच रब्बी पिकांना सुध्दा शेतकऱ्यांना टाळता न येण्यासारख्या कारणांमुळे झालेल्या नुकसानीस विमा संरक्षण मिळेल.

खरीप हंगामातील नुकसान भरपाईचे वाटप सुरू :
जिल्हयात चालू खरीप हंगामात सोयाबीन पिकावर किड व रोगाचा व्यापक प्रमाणात प्रादुर्भाव होवून पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या तरतुदीतील हंगामातील प्रतिकुल परिस्थिती या जोखमेच्या बाबीअंतर्गत अधिसूचना लागू करण्यात आली होती. त्यात ४६ हजार ९९२ शेतकऱ्यांचा समावेश असून ओरीऐंटल इन्शुरन्स कंपनीने अग्रीमासाठी २३.८० कोटी रुपये मंजुर केले आहे.

आज अखेर ११ हजार २७७ शेतकऱ्यांना ४.९४  कोटी रुपयाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आली आहे. तर उर्वरीत रक्कम जमा करण्याची कार्यवाही कंपनीमार्फत सुरू आहे, असे कंपनीचे नागपूर विभागीय व्यवस्थापक शुभम बन्सोड यांनी कळविले आहे.

Latest Posts

Don't Miss