Latest Posts

दीक्षाभूमीवर अन्नछत्र उघडण्यासाठी नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर (Nagpur) : धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त नागपूर जिल्हयात विविध ठिकाणी अन्नछत्र व भोजनदानाचे स्टॉल लावण्यात येतात. अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार प्रत्येक अन्नछत्र व भोजनदान स्टॉलधारकास नोंदणी करणे बंधनकारक आहे. ही पद्धत सोपी, सुलभ असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नोंदणी प्रमाणपत्र घेण्याकरीता foscos.fsaal.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकता. अर्जामध्ये Kind of Business-Food Vending Establishment Select करावा. अर्जासोबत शुल्क १०० रुपये प्रतिवर्ष, आधारकार्ड व फोटो अपलोड करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे रीतसर अर्ज केल्यास नोंदणी प्रमाणपत्र आपल्या Email ID वरती त्वरीत प्राप्त होते. ज्यांनी यापूर्वी नोंदणी प्रमाणपत्र घेतले आहे व त्याची मुदत संपली नसल्यास त्यांनी पुन्हा अर्ज सादर करावयाची आवश्यकता नाही.

अन्न व्यवसायिकाने खालीलप्रमाणे स्वच्छतेबाबतचे निकष पाळणे बंधनकारक आहे. अन्न पदार्थ तयार करताना (उत्पादनाची) जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. भोजनदानाकरीता लागणारा कच्चा माल व अन्नपदार्थ परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन व्यवसायिकांकडूनच खरेदी करावा. अन्न पदार्थ तयार करण्यासाठी लागणारी भांडी स्वच्छ, सुस्थितीत व झाकण असलेली असावी. तयार अन्न पदार्थ मानवी सेवनास सुरक्षित राहतील, याची खात्री करावी. आवश्यक तेवढ्याच अन्न पदार्थाची निर्मिती करावी. अन्न पदार्थ बनविण्यासाठी लागणारे पाणी पिण्यास योग्य (पोटेबल) असावे.

अन्न पदार्थ उत्पादन व वितरण करणारा स्वयंसेवक हा कुठल्याही त्वचा रोग संसर्गजन्य रोगापासून मुक्त असल्याची खात्री करून घ्यावी. अन्न पदार्थ तयार करणाऱ्या संस्थांनी आपणांस प्राप्त झालेले नोंदणी प्रमाणपत्र त्यांचे स्टॉलमध्ये दर्शनीय भागावर लावून ठेवावे. शिळे अन्न पदार्थ कोणत्याही परिस्थितीत भाविकास अथवा इतर कोणास खाण्यासाठी देवू नये. अन्न पदार्थ कचराकुंडीमध्ये टाकून वेळीच नष्ट करावेत. तसेच अन्न पदार्थ तयार करताना व वाटप करताना, तयार होणारा कचरा महानगरपालिकेने पुरविलेल्या कचराकुंडीमध्येच टाकावा. तपासणी करण्यासाठी येणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यास सहकार्य करावे व त्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे. वितरण करताना कचराकुंडी मध्येच जेवणानंतर प्लेट टाकल्या जातील याची काळजी घ्यावी.

अन्न वितरणाच्या स्टॉल मध्ये पॉलिथीन बॅग किंवा प्लॅस्टिकच्या वस्तूचा वापर करु नये. तसेच भाविकांना अन्न पदार्थ देणेकरीता अथवा अन्न पदार्थ साठविण्याकरीता वर्तमानपत्राचा वापर करु नये. या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करून उत्सवांचा आनंद द्विगुणीत करावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त (अन्न) अभय देशपांडे यांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss