– लाभार्थ्यांना ५ लाखापर्यंत आरोग्य विमा कवच
– पात्र लाभार्थ्यांनी नोंदणी करण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा (wardha) : शस्त्रक्रिया व उपचारांवर मोठ्या प्रमाणात खर्च होतो. बरेचदा हा खर्च सर्वसामान्य कुटुंबाला परवडण्यासारखा नसतो. अशा कुटुंबाला दिलासा देण्यासाठी शासनाने आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत गोल्डन कार्ड काढण्यासाठी शासनाने डिसेंबरपर्यंत मुदत दिलेली आहे. आरोग्य यंत्रणेने जलदगतीने पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या सिंधूताई सपकाळ सभागृहात आयुष्मान भारत गोल्डन कार्ड नोंदणीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.रा.ज.पराडकर, महिला व बाल कल्याणचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुनिल मेसरे, नगर परिषदेचे मुख्याधिकारी राजेश भगत, महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयक डॉ.स्मिता हिवरे, आपले सेवा सुविधा केंद्र समन्वयक अमोल महाडीक, आशा जिल्हा समन्वयक तसेच सर्व तहसीलदर, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी ऑनलाईन उपस्थित होते.
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेमध्ये १ हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११ लाख ४९ हजार ७७ एवढे लाभार्थी असून १ लाख ९७ हजार ७५ लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले आहे. एकूण लाभार्थ्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. त्यासाठी आरोग्य विभागाने युध्दपातळीवर काम करुन अधिकाधिक नोंदणी करावी. जिल्ह्यातील समाजसेवा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सुध्दा सामाजिक दायित्व म्हणून गरजू लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी कर्डिले यांनी यावेळी केले.
आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्यासाठी पोर्टल तयार करण्यात आले आहे. त्याद्वारे लाभार्थी स्वत: कार्ड काढू शकतो. तसेच आशा सेविकांना देखील कार्ड काढण्यासाठी लॉगईन आयडी देण्यात आले असून जिल्ह्यात १ हजार ७१ आशा सेविकांच्या माध्यमातून सुध्दा कार्ड काढता येईल.
https://beneficiary.nha.gov.in या संकेतस्थळावर लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे. पात्र लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.