Latest Posts

दुर्गम भागातील गावे रस्त्यांनी जोडणार : ना. धर्मराव बाबा आत्राम

– भामरागड तालुक्यात आढावा सभा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / भामरागड (Bhamragad) : महायुती सरकार कडून भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास योजना राबविण्यात येत असून या माध्यमातून अहेरी विधानसभासह जिल्ह्यातील सर्व गावे मजबूत व पक्क्या रस्त्यांनी जोडले जाणार असल्याचे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केले. शनिवार २३ सप्टेंबर रोजी त्यांनी भामरागड तालुक्यातील शासकीय कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.

आढावा सभेत प्रमुख पाहुणे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, तहसीलदार प्रकाश पुप्पलवार, गटविकास अधिकारी स्वप्नील मगदूम, उपविभागीय पोलिस अधिकारी नितीन गणापुरे, माजी प.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम, नगराध्यक्ष राम महाका, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष रमेश मारगोनीवार, सामाजिक कार्यकर्ते अरुण मुक्कावार तसेच विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना महायुती सरकारकडून ग्रामीण भागातील नागरिकांसाठी विविध विकासाच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये आणखी एक योजनेचा भर पडला असून भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास योजना राबविण्यात येत आहे. तब्बल ५ हजार कोटींच्या माध्यमातून व्हीलेज टू व्हीलेज कनेक्ट करण्यात येणार असून या योजनेचा आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यासाठी मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढेच नाही तर महायुती सरकारच्या माध्यमातून विविध शासकीय योजना राबविण्यात येत असून या सर्व योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून देऊन ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान त्यांनी तहसील कार्यालय येथे सर्व विभागांचा आढावा घेतला. त्यात रस्ते बांधकाम यंत्रणा, आरोग्य विभाग, कृषी विभाग, वीज वितरण विभाग, शिक्षण विभाग, वन विभाग, सिंचन विभाग, पाणीपुरवठा विभाग, नगर पंचायत तसेच पंचायत विभाग आदी विभागांचा समावेश होता. यात प्रामुख्याने आरोग्य विभागाकडून रुग्णांची माहिती घेऊन नागरिकांची व्यवस्थित काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कुपोषण कमी करण्याच्या अनुषंगाने योग्य नियोजन करणे, रस्ते बांधकामात दर्जेदार काम करने, सर्वांना घरकुल मिळेल असा योग्य नियोजन करणे, पाणी पुरवठा विभागाच्या कामात सुधारणा करणे असे महत्वाचे निर्देश ना. धर्मराव बाबा आत्राम यांनी संबंधित विभागांना दिले. यावेळी विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांसोबतच तालुक्यातील नागरिक देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रेला नृत्याने जंगी स्वागत – भामरागड तालुक्यात प्रवेश होताच आदिवासी बांधवांनी रेला नृत्याने ना.धर्मराव बाबा आत्राम यांचे जंगी स्वागत केले. तर त्रिवेणी व्यापारी संघटनेकडून ना. धर्मराव बाबा आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी प.स. सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम यांचा पुष्गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

Latest Posts

Don't Miss