Latest Posts

अवैध बेटिंग ॲपचा पर्दाफाश : १२३ कोटींची मालमत्ता जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : इंटरनेटच्या माध्यमातून लोकांना अवैधरीत्या बेटिंग व ऑनलाइन गेम्सची सुविधा देत असल्याचे सांगत त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये उकळत गंडा घालणाऱ्या मे. एनआययूएम कंपनीला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) दणका देत कंपनीची १२३ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी मुंबई, चेन्नई व कोची येथे १० ठिकाणी छापेमारी केली आहे.

माहितीनुसार, या कंपनीने ऑनलाइन गेम व बेटिंगसाठी ॲप तयार केले होते. याचा देशभरात प्रसार केला. या ॲपच्या वॉलेटमध्ये पैसे भरून खेळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. तसेच अधिकाधिक लोकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने सुरुवातीला घसघशीत बक्षिसेही दिली. मात्र हजारो लोकांचे कोट्यवधी रुपये प्राप्त झाल्यानंतर कंपनीचे ॲप इंटरनेटवरून गायब झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर याप्रकरणी सर्वप्रथम केरळ व हरियाणा येथून पोलिसांत तक्रार दाखल झाली होती. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती देशव्यापी असल्यामुळे व याप्रकरणी मनी लाँडरिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडी ने हा तपास सुरू केला आहे.

या घोटाळ्याद्वारे मिळालेले पैसे सिंगापूर येथे सुरू केलेल्या काही बनावट कंपन्यांकडे पाठविण्यात आले. तसेच भारतात देखील काही बनावट कंपन्यांची स्थापना करण्यात आली होती. सिंगापूर येथील कंपन्या सॉफ्टवेअर खरेदी करीत असल्याचे दाखवत त्या खरेदीपोटी हे पैसे पुन्हा भारतात पाठवत असल्याचे तपासात आढळून आले.

Latest Posts

Don't Miss