विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : राज्याच्या सागरी किनारा सुरक्षेसाठी (Sea coast safer) राज्य सरकारच्या वतीने २८ नवीन बोटी (purchase 28 boats) तीन टप्प्यात खरेदी केल्या जाणार आहेत. यापैकी पहिल्या टप्प्यात १० नवीन बोटी खरेदी केल्या जातील, अशी माहिती गृह विभागाने दिली.
याशिवाय पुढील पाच वर्षांसाठी पाच इंटरमीडिएट सपोर्ट व्हेसल्स भाडेत्तवावर घेण्यासाठी राज्य सरकारने ५१ कोटी मंजूर केले आहे.
मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याला रविवारी (२६ नोव्हेंबर) १५ वर्ष पूर्ण होत आहेत. मुंबईला लाभलेल्या सागरी किनाऱ्याची सुरक्षा करण्यासाठी पोलिसांकडे पुरेशा बोटी नाहीत. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने शनिवारी ही माहिती दिली.
राज्यात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर गृह विभागाकडून मोठ्या प्रमाणावर सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये राज्याच्या सागरी किनारा सुरक्षिततेसाठी केलेल्या उपाय योजनांचा समावेश आहे. देशाच्या पश्चिम किनाऱ्यावरील राज्यांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक पोलीस गस्त नौका आहेत. सध्या राज्यात ३० पोलीस बोटी कार्यरत आहेत आणि त्या राज्याच्या किनारपट्टीवर नियमितपणे गस्त घालत आहेत. याशिवाय राज्याने २५ ट्रॉलर भाड्याने घेतले असून, हे सर्व ट्रॉलर्स सातही सागरी पोलीस घटकांमार्फत सागरी किनारी भागात गस्त घालण्यासाठी वापरले जातात, असे गृह विभागाने म्हटले आहे.
ताफ्यातील बोटींचे आधुनिकीकरण –
सध्या असलेल्या बोटींचे आधुनिकीकरण करण्याच्या अनुषंगाने मुंबई पोलीस दलाकडील एक बोट- मुंबई २ चे आधुनिकीकरण करण्यात आले आहे. तसेच या नौकेच्या चाचणीनंतर तिचा वापर सागरी गस्तीसाठी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. याच मार्गावर इतर बोटींना कार्यान्वित करण्यात येणार आहे.