– ३१ जानेवारीपर्यंत प्रवेशिका पाठविण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandapur) : मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङमय निर्मितीसाठी प्रकाशन वर्ष २०२४ करिता शासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कारासाठीच्या प्रवेशिका जिल्हाधिकारी कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत पाठविण्यात येणार आहे.
१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर २०२४ या कालावधीत प्रकाशित झालेली प्रथम आवृत्ती पुस्तके या स्पर्धेसाठी पात्र आहेत. या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई ४०००२५ यांच्या कार्यालयात तसेच संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध होतील.
शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर नवीन संदेश या सदरात स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार २०२४ नियमावली व प्रवेशिका या शीर्षाखाली व whats new या सदरात late yashwantrao chavan state literature award 2024 rules book and application form या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णता भरून आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात १ ते ३१ जानेवारी २०२५ या विहित कालावधीत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. लेखक/प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करू शकतात.
लेखक/प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य १ ते ३१ जानेवारी २०२५ या विहित कालावधीत पाठवावे. लेखक/प्रकाशकांनी प्रवेशिका व पुस्तके पाठवितांना सदर बंद लिफाफ्यावर/ पाकिटांवर स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङमय पुरस्कार- २०२४ साठी प्रवेशिका असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्वीकारण्याचा अंतिम ३१ जानेवारी २०२५ हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांनी कळविले.