Latest Posts

शिवरायांची वाघनख ब्रिटनवरुन महाराष्ट्रात : जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात आणली जाणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : संपूर्ण महाराष्ट्राबरोबरच देशभरातील सर्व शिवप्रेमी ज्या घोषणेची आतुरतेने वाट पाहत होते ती घोषणा अखेर झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांच्या मदतीने अफझलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनख पुढल्या महिन्यात म्हणजेच जुलै महिन्यात भारतात आणली जाणार आहेत. ही वाघनख साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शिवरायांची ही वाघनख भारतात आणली जाणार आहेत. म्हणजेच १ जुलै ते ७ जुलैच्या तारखेदरम्यान ही वाघनख भारतात दाखल होणार आहेत. जुलैपासून पुढील दहा महिने म्हणजेच २०२५ च्या मे महिन्यापर्यंत ही वाघनख या संग्रहालयात प्रद्शनासाठी ठेवली जाणार आहेत. या वाघनखांच्या सुरक्षेसाठी विविध यंत्रणाही कामाला लागल्या आहेत.

२०२३ मध्ये ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियममधील ही वाघनख मायदेशी परत आणण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली एक टीम २९ सप्टेंबरला लंडनला गेली होती. वाघनख परत आणण्यासाठी तीन जणांची जी टीम लंडनला गेली होती. त्यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्यासह संस्कृती विभागाचे प्रधान सचिव डॉ. विकास खर्गे आणि राज्याच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे संचालक तेजस गार्गे यांचा समावेश होता.

५० लाखांचा खर्च –
याच दौऱ्यादरम्यान हा ऐतिहासिक, अमूल्य ठेवा मुंबईत आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ब्रिटनसोबत सामंजस्य करार केला. वाघनख पुन्हा भारतात आणण्यासाठी सुमारे ५० लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. ब्रिटिश प्रशासनाने वाघनख भारताला सुपूर्द करण्यास मान्यता दिली आहे. १८२४ मध्ये ही वाघनख ब्रिटनला नेण्यात आली होती. त्यानंतर आता शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक वारसाचा ठेवा महाराष्ट्रात आणला जावा, अशी मागणी केली जात होती. आता खरोखरच असंख्य शिवप्रेमींचे हे स्वप्न सत्यात अवतरणार आहे. महाराष्ट्रातील जनतेला याची देह, याची डोळा महाराजांच्या शौर्याची, पराक्रमाची गाथा सांगणारी ही वाघनख पाहता येणार आहेत.

एकूण चार संग्रहालयात ही वाघनख ठेवण्याची योजना –
छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली ही वाघनख राज्यातील ४ वेगवेगळ्या संग्रहालयामध्ये प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत. यामध्ये मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, साताऱ्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, नागपूरमधील सेंट्रल म्युझियम आणि कोल्हापूरमधील लक्ष्मी विलास पॅलेस या ठिकाणी ही वाघनख पाहण्याची संधी सर्वसामान्यांना मिळणार आहे. ही वाघनख केवळ ३ वर्षांसाठी भारतात आणली जाणार असून तीन वर्षांनी ती पुन्हा ब्रिटनला पाठवली जाणार आहेत.

नियोजनासाठी ११ सदस्यांची समिती –
लंडनवरुन ही वाघनख राज्यात आणण्यासाठी राज्य सरकारने ११ सदस्यांची समिती स्थापन केली आहे. वाघनख सुरक्षितपणे राज्यात आणण्याची जबाबदारी या ११ सदस्यांवर असणार आहे. तसेच राज्यामधील ४ संग्रहालयांमध्ये ही वाघनख कधी, कुठे आणि कशी सर्वसामान्यांना पाहता येतील यासंदर्भातील सविस्तर नियोजन करण्याचे कामही याच ११ जणांकडे सोपवण्यात आले आहे.

वाघनख लंडनला कशी गेली?
शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतिक असलेली वाघनख ही महाराजांच्या साताऱ्याच्या वारसदारांकडे  होती. १८१८ पर्यंत इंग्रजांनी संपूर्ण भारत खंगाळून टाकला होता. १८१८ मध्ये मराठ्यांचा इतिहास लिहिणारा ब्रिटीश अधिकारी जेम्स ग्रँड डफ राजकीय हस्तक म्हणून साताऱ्याला काम करत होता. महाराजांचे तत्कालीन वारसदार प्रतापसिंह महाराजांनी ही वाघनख डफला भेट दिली. डफने सातारा येथे १८१८ ते १८२४ या काळात काम केले. १८२४ मध्ये डफ वाघनख घेऊन ब्रिटनला परतला. मात्र, डफच्या वारसदारांनी ही वाघनख लंडनच्या म्युझियममध्ये ठेवायला दिली.

Latest Posts

Don't Miss