विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : नौदलाच्या गणवेशावर शिवरायांची राजमुद्रा असेल आणि नौदलाच्या पदांना भारतीय पद्धतीची नावे देणार असल्याची घोषणा यावेळी पंतप्रधान मोदी यांनी केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी सारे आसमंत दणाणून गेले.
हिंदुस्थानी आरमाराचा थरार –
मिग २९ के ४० विमाने, २० युद्धनौकांचा थरार पाहायला मिळाला. मरिन कमांडोजचे शोध आणि बचावकार्य, शत्रूवरील हल्ले अशा प्रात्यक्षिकांनी रोमांच उभे राहिले. नौदल बँडसोबतच जहाजांवरील रोषणाई, सिंधुदुर्ग किल्ल्यावरील लेझर शो नेत्रदीपक होता.
हिंदुस्थानी आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा करण्यासाठी यंदा शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीने नौदल दिन साजरा करण्यात आला. मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा ४५ फूट उंच भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला असून त्याचे अनावरण सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी राज्यपाल रमेश बैस, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. त्यानंतर तारकर्ली किनाऱ्यावर विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नौदलाच्या सामर्थ्याचे दर्शन यानिमिऱ्याने घडले.