Latest Posts

गडचिरोली जिल्ह्यातील १२ कौशल्य विकास केंद्रांमधून होईल रोजगार-स्वयंरोजगाराचा मार्ग प्रशस्त : खा.अशोक नेते यांचे प्रतिपादन

– पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींमध्ये मोठी क्षमता आहे. त्या क्षमतेला कौशल्याची जोड दिल्यास या जिल्ह्यातील युवा वर्ग अनेक क्षेत्रात नाव कमावतील. केंद्र सरकारने दूरदृष्टी ठेवत जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुरू केलेले १२ कौशल्य विकास केंद्र म्हणजे मैलाचा दगड ठरतील आणि त्यातून रोजगार आणि स्वयंरोजगाराचा मार्ग प्रशस्त होईल, असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी वैरागड येथे बोलताना केले.

आजच्या तरुण- तरुणींना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. याअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील १२ केंद्रांचे उद्घाटन गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. यात विसोरा, असरअली, गेदा, मुरुमगाव, पोर्ला, आष्टी, कढोली, वैरागड, सुंदरनगर, कोटगुल, आरेवाडा आणि आलापल्ली येथील ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा समावेश आहे. यातील वैरागड केंद्रावरच्या कार्यक्रमाला खासदार अशोक नेते यांनी उपस्थित राहून उपस्थित बेरोजगार युवक-युवती आणि नागरिकांना मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हा कौशल्य विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त योगेंद्र शेंडे, आरमोरीचे तहसीलदार माने यांच्यासह जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,ओमकार मडावी, वैरागडचे सरपंच, उपसरपंच आणि गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच  पोर्ला येथील कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय मिना, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्षम आणि प्रशिक्षित युवकांना मागणी- पंतप्रधान : 
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.

यावेळी मार्गदर्शन करताना पंतप्रधान म्हणाले, जगात भारतातील कार्यक्षम आणि प्रशिक्षित युवकांची मागणी वाढली आहे. बांधकाम, आरोग्य, पर्यटन, शिक्षण, वाहतूक व संदर्भीय सेवा या क्षेत्रात विशेष मागणी आहे.

प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील तरुण-तरुणी रोजगाराभिमुख प्रशिक्षित होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारतात केंद्र सरकारने कौशल्य विकास मंत्रालयाची स्थापना करून वेगळे बजेट त्यासाठी दिले आहे. कौशल्य विकासाचा सर्वाधिक लाभ गरीब कुटुंबांना होतो.

केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली असून यासाठी १३ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. राज्यातील ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रातून ही योजना कार्यान्वित होईल, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.

Latest Posts

Don't Miss