विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / यवतमाळ (Yavatmal) : ॲण्ड्रॉइड मशीनमधील रोलमधून निर्धारित संख्येपेक्षा कमी तिकीट निघाल्याचा दणका वाहकांना बसणार आहे. आतापर्यंत हे नुकसान एसटी महामंडळ सहन करीत होते. २२६ तिकिटांचा कागद खराब झाल्यास १८ टक्के जीएसटीसह ११ रुपये ८० पैसे वाहकांकडून वसूल केले जाणार आहेत.
त्यामुळे रोलची नासाडी होणार नाही, याची दक्षता वाहकांना बाळगावी लागणार आहे.
प्रवाशांना तिकीट देण्यासाठी ईटीआय मशीनमध्ये थर्मल पेपर रोलचा वापर केला जातो. या रोलची लांबी १३ मीटर आहे. एका रोलमधून प्रत्यक्षात २३८ तिकिटे निघतात. मार्ग तपासणी पथकाकडून इन्स्पेक्शन रिपोर्ट व इतर कारणांमुळे काही पेपरचा वापर होतो. त्यामुळे रोलच्या पाच टक्के, अर्थात १२ तिकिटे कमी करून प्रतिरोल मर्यादा २२६ तिकिटे अशी करण्यात आली आहे. कमी तिकीट निघाल्यास रोलमागे ११ रुपये ८० पैसे अदा केले जात होते.
कुठे व कसा हाेतो रोल खराब? :
तांत्रिक कारणामुळे अनेकदा कागदावर तिकिट प्रिंट होत नाही. अशावेळी दुसरे तिकीट द्यावे लागते. परंतु, नोंद एकाच तिकिटाची होते. बॅटरी डाऊन झाल्यास तिकीट ओढून काढावे लागते. या प्रकारात जादा कागद ओढला जातो. शिवाय, गिअर अडकल्यानेही पेपर रोल खराब होतो. रोल संपत आला असल्यास नवीन टाकला जातो. त्यात शिल्लक राहिलेला पेपर नासाडीच्या हिशोबात धरला जातो. त्यामुळे आता शेवटच्या कागदापर्यंत रोल वापरावा लागणार आहे.