Latest Posts

यंदा दोन स्वरमैफली दीपावलीत गडचिरोली नगरी करणार सूरमयी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आपल्या विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी प्रसिद्ध असलेल्या अजब-गजब विचार मंचाच्या वतीने यंदाही प्रकाशपर्व दीपावलीनिमित्त सप्तसुरांची मेजवानी मिळणार आहे. विशेष म्हणजे यंदा एक संध्याकाळी व एक पहाटे अशा दोन स्वरमैफलींची मेजवानी देण्यात येणार आहे. त्यामुळे सप्तसुरांचा हा डबल धमाका अवघी गडचिरोली नगरीच सूरमयी करणार आहे.

यंदा संगीत महोत्सव – २०२३ अंतर्गत अवीट गोडीच्या मराठी व हिंदी गीतांच्या दीपावली सांध्य मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुवार ९ नोव्हेंबर ला सायंकाळी ७ वाजता स्थानिक गडचिरोली- चंद्रपूर मार्गावरील विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित ही मैफल शास्त्रीय संगीत क्षेत्रातील नामवंत पं. गुणवंत घटवाई, गायक सारंग जोशी, गायिका श्रेया खराबे, गायिका राधा ठेंगडी आपल्या सुमधुर सुरांनी सजवणार आहेत. रसिक या सूरमयी संध्येच्या सुरावटीत असतानाच शुक्रवार १० नोव्हेंबर ला पहाट स्वरांच्या दिव्याची पर्व – १० वे ही खास पाडवा पहाट स्वरमैफल सुरांचा नजराणा सादर करणार आहे. ही मैफलसुद्धा विद्याभारती हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयात होणार आहे. या मैफलीत पं. गुणवंत घटवाई, गायक सारंग जोशी, गायिका श्रेया खराबे, गायिका राधा ठेंगडी, निकिता चंदनखेडे गायन करणार आहेत. दोन्ही मैफलींचे संचालन किशोर गलांडे करणार आहेत.

अजब-गजब विचार मंच, गडचिरोली ही जिल्ह्यातील नामांकित सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला क्षेत्रात काम करणारी संस्था असून मागील दहा वर्षांपासून दिवाळी पहाट या जिल्ह्यात एकमेव कार्यक्रमाचे आयोजन करत असते. या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दिवाळी सणाच्या नागरिकांना संगीतमय मेजवानीने शुभेच्छा देणे तसेच उच्च दर्जाच्या नामांकित कलाकारांच्या कलेचा याची देही…याची डोळा अनुभव घेण्याची संधी देणे तसेच भावी पिढीला सांस्कृतिक वारसा जपण्यास प्रोत्साहन देणे हा आहे. यात उत्कृष्ट कलाकार, उत्कृष्ट वाद्यवृंद, दर्जेदार शामियाना, ध्वनी यंत्रणा, उत्तम प्रकाश योजना असते. या दोन्ही कार्यक्रमांत नागरिकांना मोफत प्रवेश राहणार आहे.

सदर या दोन्ही सूरमयी मैफलींचा मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंद घेण्याचे आवाहन अजब-गजब विचार मंचाचे सतीश त्रिनगरीवार, आशुतोष कोरडे, सचिन मून, सतीश विधाते, नंदकिशोर काथवटे, विश्राम होकम, सुभाष धंदरे, मिलिंद उमरे, ओमप्रकाश संग्रामे, सूरज खोब्रागडे, प्रवीण खडसे, दत्तू सूत्रपवार, डॉ. प्रशांत चलाख, प्रतीक बारशिंगे व इतर आयोजकांनी केले आहे.

Latest Posts

Don't Miss