Latest Posts

ताडोबाची सेलिब्रिटी वाघीण ‘माया’ बेपत्ता : वनविभागाकडून शोध मोहीम सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : ताडोबा व्याघ्रप्रकल्पातून पर्यटकांसाठी आकर्षण असलेली प्रसिद्ध माया वाघिण गेल्या काही दिवसांपासून गायब झाल्याची चर्चा आहे. माया वाघिण तिचं परिक्षेत्र सोडून दुसरीकडे स्थलांतरीत झालीय का याचा शोध आता वनविभागाकडून घेतला जात आहे. १ ऑक्टोबरपासून पर्यटकांसाठी पुन्हा व्याघ्रप्रकल्प पर्यटनासाठी सुरू झाला आहे. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.

याबाबत ताडोबा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्र निदेशक जितेंद्र रामगावकर म्हणाले की, ताडोबा व्याघ्रप्रकल्प पर्यटकांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद होता. त्यामुळे वन कर्मचाऱ्यांचीही पाहणी कमी झाली होती. आता १ ऑक्टोबरला पर्यटनाला सुरुवात झाली आहे. सुरुवात होताच आपल्याला ठराविक वाघ किंवा वाघिण दृष्टीस पडेल अशी अपेक्षा करणे मूळात चुकीचे आहे.

व्याघ्र प्रकल्पाचा विस्तार जवळपास १७०० स्क्वेअर किमी आहे. त्यात १०० पेक्षा जास्त वाघांचे अस्तित्व आहे. त्यामुळे एखाद्या वाघ निदर्शनास न पडणे त्यावरून हा गायब झालाय, काहीतरी शंका व्यक्त करणे घाईचे ठरेल. काही दिवस आमची मॉनेटरिंग सिस्टमला वेळ द्यावा, आमची यंत्रणा काम करतेय. परिसरात कॅमेरा ट्रॅप लावले आहेत. त्यात वाघिणीला जर पिल्ले झाली असतील. किंवा एखाद्या घटनेमुळे फॅक्टरमुळे वाघिण तिचं परिक्षेत्र सोडून गेलीय का हेदेखील पाहणे गरजेचे आहे. कमीत कमी २५-३० दिवस सिस्टमॅटिक ट्रेसिंग ठेवल्यानंतर काहीतरी कळेल. तोपर्यंत कुठलाही निष्कर्ष काढणे योग्य राहणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच वाघांचे जीवन फार कठीण असते. वाघ १०-१५ वर्षापर्यंत जिवंत राहतो. ताडोबात वाघांची घनता आणि क्षेत्र आहे त्यात वाघांना संघर्ष करावा लागतो. कारण नवनवीन वाघ येत असतात. वाघांच्या लढाई होतात. नवीन ठिकाणी वाघांना पाठवले जाऊ शकते. वाघिणींना पिल्ले होऊ शकतात. म्हणून वेगळी रणनीती वाघिण अवलंबते, त्यामुळे अनेक फॅक्टर्स यामागे असू शकतात. त्यामुळे आमची सिस्टमॅटिक यंत्रणा जेव्हा काही तरी समोर घेऊन येईल तेव्हा ती माहिती सगळ्यांसमोर ठेवली जाईल असंही जितेंद्र रामगावकर यांनी सांगितले.

दरम्यान, माया वाघिणीचे वय १३ वर्ष आहे. जंगलात एखादा वाघ १२ ते १५ वर्ष जगू शकतो. त्यात कदाचित नैसर्गिक मृत्यूही वाघिणीचा झाला असा संशय व्यक्त करण्यात येतोय. परंतु सगळ्या गोष्टींची पडताळणी ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या वन अधिकाऱ्यांकडून तपासून घेतली जात आहे. लवकरच माया वाघिण पर्यटकांच्या दृष्टीस पडेल अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे.

Latest Posts

Don't Miss