Latest Posts

तलाठी निवड यादी जाहीर : २३ जिल्ह्यांत लागला निकाल, यादी संकेतस्थळावर उपलब्ध

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / पुणे (Pune) : बहुप्रतीक्षित तलाठी परीक्षेची निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. भूमिअभिलेख विभागाने पेसा अंतर्गत असलेले ते १३ जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांसाठी ही यादी जाहीर केली आहे.
संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी संकेतस्थळावर यादी निवड झालेल्या उमेदवारांना पाहता येणार आहे.

तलाठी परीक्षेची गुणवत्ता यादी ६ जानेवारीला जाहीर करण्यात आली होती. त्यात १३ आदिवासी बहुल जिल्ह्यांमधील पेसा अंतर्गत रिक्त जागांबाबत सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने हे जिल्हे वगळून अन्य २३ जिल्ह्यांमधील निवड यादीची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भूमी अभिलेख विभागाकडून हे युद्धपातळीवर करण्यात आले आहे. निवड यादी अर्थात यशस्वी उमेदवारांची यादी जिल्हानिहाय तयार करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयातील निकालानंतरच या १३ जिल्ह्यांमधील उमेदवारांच्या निवड प्रक्रियेची कार्यवाही करण्यात येणार आहे.

पेसा वगळता अन्य २३ जिल्ह्यांमधील जिल्हा निवड समिती यांनी ही निवड यादी तयार केली आहे संबंधित यादी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती तलाठी परीक्षेच्या राज्यसमांवर तथा प्रभारी अप्पर अतिरिक्त सरिता नरके यांनी दिली. निवड प्रतीक्षा यादीनंतर उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्र व संबंधित कागदपत्रे यांची पडताळणी, वैद्यकीय तपासणी चारित्र्य पडताळणी तसेच समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही नियुक्ती पूर्वीची कार्यवाही संबंधित जिल्हा निवड समितीमार्फत केली जाणार आहे.

तलाठी भरती परीक्षेसाठी राज्यातील साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीनंतर ४ हजार ४६६ जागांसाठी १० लाख ४१ हजार ७१३ एवढे अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ८ लाख ६४ हजार ९६० उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्यात आली. त्यानंतर ६ जानेवारीला गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

२३ जिल्हे –
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, हिंगोली.

Latest Posts

Don't Miss