Latest Posts

शिक्षकांच्या डोकेदुखीत वाढ : विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने घ्यावी लागणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : राज्यातील शिक्षकांना आधीच शैक्षणिक कामांपेक्षा अशैक्षणिक कामेच अधिक दिलेली आहेत. त्यामुळे शिक्षकांचा हि कामे करत असतानाच विद्यार्थ्यांना दैनंदिन अध्यपान देखील करावे लागत आहे.

हि सर्व कामे करत असतानाच अनेक ऑनलाईन देखील कामे करावी लागत आहेत. त्यात आता विद्यार्थी रोजची उपस्थिती देखील मोबाइल अ‍ॅपद्वारे घेण्याची नव्याने भर पडणार आहे. त्यामुळे या नवीन ऑनलाईन कामाने शिक्षक पुरते वैतागून गेले आहेत.

सध्या राज्यातील सर्वच शाळांचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले आहे. त्यामुळे आता सर्व शाळेत चिमुकल्यांचा किलबिलाट सुरु आहे. दरम्यान कोरोनामुळे सलग दोन वर्षे शाळा बंद होत्या, त्यावेळी ऑनलाईन पद्धतीने क्लास घेतले जात होते. मात्र याचा सर्वच विद्यार्थ्यांना म्हणावा तसा फायदा झाला नाही.

ग्रामीण भागात तर अनेकदा मोबाईल नेटवर्क तसेच इतर समस्या असल्यामुळे विद्यार्थी शिक्षणापासून दूरच राहिले आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना अद्याप लिहिता व वाचता देखील येत नाही.

अशा विद्यार्थ्यांना काही शिक्षक आपल्या परीने शिकविण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शिक्षकांना विविध अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवण्यात आले आहे.

त्यामुळे त्यांचे लक्ष शिकविण्यापेक्षा इतर कामांतच अधिक असते. अशा वेळी गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अपेक्षा करणे चुकीचे ठरत आहे. आजही बऱ्याच शाळेत एकच शिक्षक आहे. ज्या शाळेमध्ये केवळ एक शिक्षक आहे, त्या शाळेमध्ये तर शिक्षकांचे खूप हाल होत आहेत.

विद्यार्थ्यांना सांभाळण्यापासून ते अशैक्षणिक कामे करताना त्यांच्या नाकीनऊ येत आहेत. एखाद्या दिवशी सुटी घेतली तरी शाळा बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर येते.

हि कामे कमी होती म्हणून कि काय आता स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित व अंशतः अनुदानित शाळेतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती स्विफ्टचॅट या मोबाइल अ‍ॅपद्वारे स्मार्ट उपस्थिती ऑनलाईन पद्धतीने नोंदविण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे राज्यातील शिक्षकांना पुन्हा एकदा विद्यार्थी ऑनलाईन उपस्थितीचे काम करावे लागणार आहे. परिणामी शिक्षकांचे काम पुन्हा वाढणार आहे. यामुळे अगोदरच विविध अशैक्षणिक कामाने शिक्षक बेजार झाले आहेत.

कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता ऑनलाईन कामे शिक्षकांच्या मस्तकी मारली जात आहेत. त्यात आणखी एका कामाची नव्याने भर पडल्याने शिक्षण संघटना काय भूमिका घेतात हे महत्वाचे ठरणार आहे.

Latest Posts

Don't Miss