Latest Posts

तीन मुले असलेल्या पोलिसांच्या एकाही वारसाला अनुकंपा नोकरी नाही

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / नवी दिल्ली : तीन मुले असलेल्या पोलिसाच्या कोणत्याच वारसाला अनुकंपा नोकरी देता येत नाही. तसा अध्यादेशच सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे, असे प्रतिज्ञापत्र सोमवारी उच्च न्यायालयात सादर करण्यात आले. ३१ डिसेंबर २००१ नंतर ज्या पोलिसाला तिसरे अपत्य झाले आहे, त्याला हा नियम लागू होतो.

न्या. ए.एस. चांदुरकर व न्या. जितेंद्र जैन यांच्या खंडपीठासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले. सामान्य प्रशासन विभागाचा हा अध्यादेश प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. त्यामुळे तो लागूच होत नाही, असा दावा ॲड. दिनेश अडसुळे यांनी केला. याबाबत सविस्तर सुनावणी घेऊ, असे न्यायालयाने स्पष्ट केले. यावरील पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.

प्रतिज्ञापत्रातील दावा –
ठाणे येथील सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रशासन) सुरेंद्र जगन्नाथ शिरसाट यांनी हे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अनुपंपा नोकरी कोणाला देता येईल याचे निकष सांगणारा अध्यादेश २८ मार्च २००१ रोजी सामान्य प्रशासन विभागाने काढला. तीन अपत्य असलेल्या पोलिसाचा कोणताच वारस अनुपंपा नोकरीसाठी पात्र नाही, असे या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे. हा अध्यादेश सर्व पोलिसांना ज्ञात आहे, असा दावा प्रतिज्ञापत्रात करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण –
ठाणे पोलिसांतील पोलीस नाईक सुनील अहिरे यांचे १८ फेब्रुवारी २०१३ रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा नोकरी मिळावी यासाठी विद्या सुनील अहिरे व मनीष सुनील अहिरे यांनी ॲड. दिनेश अडसुळे यांच्या मार्फत ही याचिका केली आहे. १९९४, १९९६ व २००१ च्या सामान्य प्रशासन विभागाच्या अध्यादेशानुसार पोलिसाच्या वारसाला अनुपंपा नोकरी देता येते. मनीषला अनुपंपा नोकरी द्यावी, असा अर्ज प्रशासनाकडे करण्यात आला. पोलीस खात्याने अनुपंपा नोकरी नाकारली. महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणात (मॅट) याविरोधात दाद मागण्यात आली. मॅटने अनुपंपाचा दावा नाकारला. न्यायालयानेच अनुपंपा नोकरी देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

३१ डिसेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झालेले असल्यास अपात्र –
३१ डिसेंबर २००१ नंतर ज्या पोलिसाला तिसरे अपत्य झाले असेल त्याला हा नियम लागू होतो, असे या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. पोलीस नाईक सुनील अहिरे यांना तीन मुले आहेत. त्यांच्या तिसऱया मुलाचा जन्म ७ ऑगस्ट २००२ रोजी झाला आहे. त्यामुळे त्यांच्या कोणत्याच वारसाला अनुपंपा नोकरी देता येणार नाही, असा दावा प्रतिज्ञापत्रात केला आहे.

जुळी मुले असल्यास अध्यादेशाचा लाभ –
सिद्धेश सावंत या पोलिसाला तीन मुले असतानाही त्याच्या वारसाला अनुकंपा नोकरी देण्यात आली, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे. सिद्धेश सावंत यांना जुळी मुले होती. परिणामी जरी त्यांना तीन मुले असली तरी ते प्रकरण वेगळे होते. याचिकेतील मुद्द्यांशी त्याचा काहीही संबंध नाही, असेही प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे.

Latest Posts

Don't Miss