Latest Posts

तिसऱ्या दिवशी सापडला नदीत बुडालेला मृतदेह

– कुटूंबावर शोककळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / चामोर्शी (Chamorshi) : आंघोळीसाठी मित्रांसोबत गेलेल्या करण गव्हारेचा १३ नोव्हेंबर रोजी वैनगंगा नदीत बुडून मृत्यू झाला होता. मात्र मृतदेहाचा पत्ता लागला नसल्याने दोन दिवस नाव व बोटने शोध मोहीम राबविण्यात आली होती. ड्रोन कॅमेऱ्याने शोध घेणे सुरूच होते तरीही मृतदेहाचा पत्ता लागला नव्हता. १५ नोव्हेंबरला तिसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता करणचा मृतदेह हाती सापडला आहे.

माहितीनुसार, करण गजानन गव्हारे हा चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा (रै.) येथील रहिवासी असून, एटापल्ली येथे एका कंत्राटदाराकडे काम करीत होता दिवाळी सणानिमित्य तो कुनघाडा (रै.) स्वगावी आला होता. १३ नोव्हेंबरला सकाळी ११ वाजता कुनघाडा (रै.) ते डोनाळा वैनगंगा नदी घाटावर आपल्या १० ते १२ मित्रांसोबत आंघोळीसाठी गेला होता. त्यापैकी तीन मित्र नावेवर बसून नाव चालविण्यात मग्न होते. नाव अचानक प्रचंड प्रवाहाच्या दिशेने खोल पाण्यात गेल्यामुळे भीतीने तिघांनीही आरडाओरड केली. तिघेही नावेवरून पाण्यात उडी मारून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात होते, एका मित्राची आरडाओरड ऐकुण मित्राचा जीव वाचविण्यासाठी पाण्याच्या बाहेर असलेल्या करणने प्रवाहाच्या दिशेने पाण्यात उडी मारली तिघेही मित्र स्वतःचा जीव वाचवत कसेबसे बाहेर पडले. मात्र पाण्याचा प्रचंड प्रवाहाचा करणला अंदाज घेता आला नसल्याने तो खोल पाण्यात बुडूनच राहिला. करणच्या मृतदेहाचा शोध लागत नसल्याने पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन पथकाने नाव व बोटीने दोन दिवस शोधमोहीम राबवली तसेच ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने शोध घेत होते. मात्र दोनही दिवस मृतदेहाचा पत्ता लागला नाही. १५ नोव्हेंबरला तिसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान जवळपास दीड ते दोन किमी अंतरावर तळोधी-कुनघाडा परिसरातील कवठाच्या घाटावर खडकाला अडकून मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे मच्छीमारांच्या निदर्शनास आल्याक्षणी नातेवाईकांना माहिती दिली. नातेवाईकांकडून पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांच्या स्वाधीन केले.

पुढील तपास पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. घटनास्थळी पोलीस पाटील दिलीप श्रुंगारपवार, महसूल व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

१५ नोव्हेंबरला सायंकाळी ३ वाजता वैनगंगा नदी घाटावर करणवर साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. करणच्या पच्छात आई, वडील, आजोबा, आजी व एक विवाहित बहीण आहे. त्याच्या अकाली मृत्यूने कुटुंबाला फार मोठा धक्का बसला असून, गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Latest Posts

Don't Miss