विदर्भ न्यूज एक्सप्रेस
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : मुंबईतील केईएम (KEM Hospital) रुग्णालयात एका ११ वर्षांच्या मुलीवर खुबा बदलाची (Hip Replacement Surgery) शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. फरजाना खातून असे या मुलीचे नाव असून अशा प्रकारची शस्त्रक्रिया झालेली फरझाना ही सगळ्यात कमी वयाची रुग्ण ठरली आहे.
सर्वसाधारणपणे ही शस्त्रक्रिया वृद्धांवर केली जाते. १७ पेक्षा कमी वय असलेल्या मुलांमध्ये ही शस्त्रक्रिया करण्याची वेळ येणे ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. फरझाना खातून ही मूळची बिहारमधील मधुबनी जिल्ह्यातील असून गेल्या काही महिन्यांपासून तिला चालताना भयंकर वेदना सहन कराव्या लागत होत्या. सगळ्या तपासण्या आणि चाचण्या केल्यानंतर केईएम रुग्णालयाच्या डॉक्टरांनी या मुलीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला होता.
तीव्र वेदनांमुळे फरझानाला नीट चालता येत नव्हते ज्यामुळे तिची चाल विचित्र झाली होती. फरझाना जवळपास १ वर्षभर टीबीची औषधे घेत होती, कारण तिला टीबी झाल्याचे सांगण्यात आले होते, ज्यामुळे तिला ही औषधे घ्यावी लागत होती. तिच्या आईने सांगितले की २ वर्षांत त्यांनी अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला मात्र कोणालाही अचूक निदान करता आले नाही. पाटण्यातील एका डॉक्टरने आम्हाला केईएम रुग्णालयात जाण्यास सांगितले होते असे फरझानाची आई झीनत हिने सांगितले आहे. केईएममध्ये आल्यानंतर फरझानाची एमआरआय चाचणी करण्यात आली, ज्यामध्ये तिच्या खुब्याचे सांधे पूर्णपणे झिजल्याचे दिसून आले.
सर्वसाधारणपणे लहान मुलांमध्ये खुबाबदलाची शस्त्रक्रिया करण्यात येत नाही. १२ वर्षाखालील मुलांमध्ये जर खुब्याचा त्रास झाला तर निव्वळ झीजलेला भाग काढून टाकला जातो, मात्र यामुळे या मुलांच्या हालचालींवर मर्यादा येत असतात. लहान मुलांमध्ये खुबा बदलाची शस्त्रक्रिया केल्यास त्यांच्या शरीराच्या वाढीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाढ झाल्यानंतर ही सस्त्रक्रिया करण्यात येते. मात्र ही शस्त्रक्रिया यशस्वी होण्याची शक्यता कमी असते आणि त्यात स्नायूंना इजा होम्याचाही धोका असतो.