विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : अतिशय गाजावाजा करून आणि १०० कोटी खर्च करून गडचिरोली शहरात बांधण्यात आलेली भूमिगत गटार योजना त्वरित कार्यान्वित करावी व या योजनेतून सुटलेल्या वस्त्यांमध्येही हि योजना लागू करावी, अशी मागणी अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाने केली आहे.
पक्षाच्या एका शिष्टमंडळाने आज नगर परिषदेचे मुख्याधिकारी ओमकार पवार यांची भेट घेऊन या मागणीसह शहरातील अन्य समस्यांचे निवेदन त्यांना सादर केले व सविस्तर चर्चा केली.
गडचिरोली शहरातील प्रमुख चौकांमध्ये भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे स्तंभ उभारण्यात यावे, नगर परिषदेची स्वतंत्र प्रशासकीय इमारत त्वरित पूर्ण करण्यात यावी व सध्याची इमारत आदिवासी समाजाला हस्तांतरित करण्यात यावी, शहरातील नाल्यांची नियमाची सफाई करण्यात यावी, रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, नवीन वस्त्यांमध्ये रस्ते बांधण्यात यावे, वीर बाबुराव शेडमाके स्मारक ते महात्मा फुले चौक पर्यंत नवीन रास्ता बांधण्यात यावा, वीर बाबुराव शेडमाके स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, या मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
शहरातील चारही प्रमुख रस्त्यांवर सार्वजनिक मुताऱ्या व शौचालये बांधण्यात यावीत, इंदिरा चौकातील राजीव गांधी सभागृहाची जागा नगर परिषदेने आपल्या ताब्यात घेऊन तेथे आधुनिक सोयींनी युक्त सभागृह बांधण्यात यावे, शहराच्या मध्यभागी असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, शहरातील ओपन स्पेसेसचे सौंदर्यीकरण करण्यात यावे व तेथे पार्क बनविण्यात यावे, दलित वस्त्यांमध्ये सार्वजनिक वाचनालये व अभ्यासिका सुरु करण्यात याव्या, शहरातील मोकाट जनावरे व कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करण्यात यावा इत्यादी मागण्यांचा या निवेदनात समावेश होता.
या मागण्यांबाबत मुख्याधिकारी ओम्कार पवार यांनी शिष्टमंडळ सोबत सविस्तर चर्चा केली व त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांचे नेतृत्वात भेटलेल्या या शिष्टमंडळात जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, प्रदेश सचिव केशवराव सामृतवार, विधानसभा अध्यक्ष प्रदीप भैसारे, महिला आघाडी नेत्या सुरेखा बारसागडे, शहर सचिव साईनाथ गोडबोले, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नीता सहारे, शहर अध्यक्ष वनमाला झाडे, उपाध्यक्ष ज्योती चौधरी, कल्पना रामटेके, सरिता बारसागडे, भीमराव मेश्राम व अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.