Latest Posts

वैरागड गावाजवळ पोहोचली वाघांची जोडी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : आरमोरी वनपरिक्षेत्रातील वैरागड-रामाळा मार्गालगत असलेल्या रामाळा बिटात २९ सप्टेंबर रोजी रात्री आरमोरीवरून येणाऱ्या चारचाकी वाहनधारकांना वाघाच्या जोडीचे दर्शन झाले. याबाबतची चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने परिसरात दहशत निर्माण झाली. वन्यजीव सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर वन विभागसुद्धा अलर्ट झाला असून या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

वैरागड येथील काही युवक २९ सप्टेंबरला सायंकाळी आरमोरी येथे कामानिमित्य गेले होते. काम आटोपून गावाकडे परत येत असताना रात्री ८:५० वाजता रामाळा-वैरागड मार्गावरील वळणावर कक्ष क्र. ४० मध्ये दोन वाघ जोडीने आढळले. युवकांनी मोबाइलमध्ये चित्रीकरण करून तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या व्हिडीओमध्ये दोन वाघ स्पष्टपणे दिसत आहेत.

व्हायरल व्हिडीओची दखल वन विभागाने घेऊन वैरागड- रामाळा दरम्यान डांबरी रस्त्यालगत जंगलात जाणारे सर्व रस्ते बंद करून परिसरातील गावांना वाघांचा वावर असल्याची सूचना दिली.

वनविभागाच्या पुढच्या सूचनांशिवाय जंगलात प्रवेश करू नये किंवा उशिरापर्यंत या रस्त्याने ये-जादेखील करू नये. जंगलाशेजारी असलेल्या शेतात दुपारी ४ वाजतानंतर कोणी थांबू नये व एकट्या-दुकट्याने शेतात जाऊ नये, असे आवाहन करीत व्याघ्र संरक्षक दल तैनात केले.

रामाळा बिटात व परिसरात वाघाच्या जोडीचा वावर असून वन विभागाने ट्रॅप कॅमेरे लावले आहेत. वाघांचा वावर असल्याचे लोकेशन मिळताच व्याघ्र दल प्रकल्पाच्या मार्फत  वाघांचा बंदोबस्त करण्यात येईल, पण तोपर्यंत कोणीही जंगलात प्रवेश करू नये. – आर. पी. कुंभारे, क्षेत्रसहायक, आरमोरी

Latest Posts

Don't Miss