Latest Posts

मनपा आयुक्तांकडून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन

– पप्पू देशमुख यांनी  जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन तक्रार केली : 
– निलंबन व फौजदारी कारवाई करण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर (Chandrapur) : आचारसंहितेच्या काळात रामाळा तलावाचे पुनर्जिवन प्रकल्पाच्या २४.६२ कोटी रूपये कामाची ई-निविदा प्रक्रिया सुरू करुन मनपा आयुक्त विपिन पालिवाल यांनी आचारसंहितेचा भंग केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या आयुक्तांचे निलंबन करुन त्यांच्यावर फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी राज्याचे  तसेच चंद्रपूर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे. २२मार्च रोजी सांयकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी विनय गौडा यांची प्रत्यक्ष भेट घेऊन देशमुख यांनी लेखी तक्रार केली.

लोकसभा २०२४ च्या निवडणुकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता १६ मार्च  पासून लागू करण्यात आली आहे. आदर्श आचारसंहिता लागू झाल्याच्या तारखेपासून कोणत्याही नवीन कामाची ई-निविदा प्रकाशित करणे किंवा ई-निविदा प्रक्रिया सुरू करणे हा आदर्श आचारसंहितेचा भंग ठरतो. मात्र तरीसुद्धा मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी १८ मार्च रोजी ‘चंद्रपूर शहरातील रामाळा तलावाचे पुनर्जिवन प्रकल्प’ या नविन कामाची सुमारे २४.६२ कोटी रूपये अंदाजपत्रक असलेली ई-निविदा राज्य शासनाच्या वेबसाईटवर अपलोड केली आहे. आपातकालिन परिस्थिती नसताना किंवा अत्यावश्यक काम नसताना तसेच सक्षम निवडणूक अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता पालीवाल यांनी आचारसंहितेच्या काळात सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू करुन आचारसंहितेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांचे निलंबन करुन फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.

आचारसंहितेपूर्वीच प्रसिद्ध केल्याचे भासवले ; 
ऐन आचारसंहितेच्या तोंडावर १५ मार्च २०२४ रोजी तीन वर्तमानपत्रांमध्ये सदर ऑनलाइन ई-निविदेची जाहिरात दिली. या जाहिरातीमध्ये १८ मार्चपासून सदर ऑनलाइन ई-निविदा प्रकाशित करण्यात आल्याचे नमूद केले. १५ मार्चपासून सदर ई-निविदा प्रक्रिया सुरू झाली असे भासविण्याकरिता त्यांनी हे सर्व कटकारस्थान केले. ज्या तारखेला शासनाच्या वेबसाईटवर निविदा प्रपत्र विक्री करिता अपलोड होते त्याच तारखेपासून ई-निविदा प्रक्रिया सुरू होते याची पुरेपूर माहिती पालीवाल यांना आहे. असे असतानाही त्यांनी सदर कामाची ई-निविदा प्रक्रिया आचारसंहितेच्या दरम्यान सुरू केली व आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोपही देशमुख यांनी तक्रारीत केला आहे..

सात वर्षांपासून जिल्ह्यातच नियुक्ती : 
विपिन पालीवाल हे २०१५ ते २०२० पर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर व पोंभुर्णा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत होते. मार्च २०२० नंतर जवळपास एक वर्षाकरिता त्यांची वर्धा येथे मुख्याधिकारी म्हणून बदली झाली. जून २०२१ पासून आतापर्यंत पालिवाल चंद्रपूर शहर महानगरपालिकेत कार्यरत आहेत. सुमारे एक वर्षाचा वर्धा जिल्ह्यातील कार्यकाळ वगळता  पालीवाल हे सुमारे सात वर्षांपासून चंद्रपूर जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांची कारकीर्द वादग्रस्त असून मर्जीतील कंत्राटदारांना लाभ पोहोचविण्यासाठी करोडो रुपयांच्या अनेक कामांमध्ये गैरव्यवहार केल्याचे आरोप त्यांच्यावर असल्याचे देशमुख यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Latest Posts

Don't Miss