Latest Posts

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक : जिल्हाधिकारी राहूल कर्डिले

– नाव नोंदणी करण्यासाठी १९ ऑक्टोबर पर्यंत अंतिम मुदत

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा (Wardha) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून २० नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील एकूण २८८ विधानसभा मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदान घेणार आहे. या निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे, ज्यांनी आपले नाव मतदार यादीत अद्याप समाविष्ट केलेले नाही त्यांना अजूनही १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत मतदार यादीत आपले नाव नोंदवण्याची संधी आहे. आपले नाव आर्वजून मतदार यादीत समाविष्ट झाले असल्याची खात्री प्रत्येक मतदाराने करावी. तसेच ज्यांनी अजून आपले नाव मतदार यादीत समाविष्ट केले नाही त्यांनी तातडीने १९ ऑक्टोबरच्या आत आपले नाव मतदार यादीत नोंदवावे, जेणेकरुन मतदानाच्या दिवशी मतदानाचा आपला हक्क मतदारांना बजावता येईल, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले.

अजूनही ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदवलेले नाही त्यांना १९ ऑक्टोबर रोजी रात्री पर्यंत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने मतदार यादीत नाव नोंदणी करण्याची संधी उपलब्ध असून निरंतर मतदार नोंदणीचा कार्यक्रम अद्याप सुरु आहे. त्यामुळे ज्या पात्र नागरिकांची आतापर्यंत मतदार नोंदणी झालेली नाही, अशा नागरिकांकडून उमेदवारांचे नामनिर्देशनपत्रे दाखल करण्याच्या अंतिम दिनांकाच्या १० दिवस अगोदरपर्यंत म्हणजेच १९ ऑक्टोबर पर्यंत प्राप्त झालेले अर्ज क्र. ६ मतदार यादीमध्ये नोंद घेण्यासाठी विचारात घेण्यात येतील. तरी या संधीचा लाभ घेऊन सर्व पात्र नागरिकांनी मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करत मतदानाचा आपला हक्क आर्वजून बजावावा, तसेच सर्व मतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट असल्याची खात्री तातडीने करुन घ्यावी, असे आवाहन श्री. कर्डिले यांनी केले आहे.

मतदार नोंदणी करण्यासाठी पात्र नागरिक भारत निवडणूक आयोगाच्या मतदाता सेवा पोर्टलव्दारे https://voters.eci.gov.in/या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करु शकतात. मतदार यादीमध्ये नव्याने नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज क्र. ६ भरावा. मतदार यादीमध्ये नाव शोधणे, ऑनलाईन केलेल्या अर्जाचा मागोवा घेणे, मतदान आणि केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांची नावे, आधार संलग्न करणे आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.

Latest Posts

Don't Miss