Latest Posts

बल्लारपुर विधानसभेतील ३ लाख ९७८ मतदार बजावणार मतदानाचा हक्क

– ३६१ मतदान केंद्र, १ हजार ५८८ कर्मचारी राहणार तैनात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर (Ballarpur) : चंद्रपूर लोकसभा खासदार निवडून देण्यासाठी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात एकूण ३ लक्ष ९७८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यासाठी ३६१ मतदान केंद्र व १ हजार ५८८ कर्मचारी तैनात राहणार अशी माहिती ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी १७ मार्चला मुल येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

चंद्रपूर लोकसभा मतदार संघात पहिल्या टप्यात निवडणूका पार पडणार असल्याने आचारसंहितेचे काटेकोर पालन व निवडणूकीचे वेळापत्रक, विधानसभा निहाय मतदारांची आकडेवारी याबाबत सविस्तर माहिती पत्रकार परिषदेतून उपविभागीय अधिकारी मुल तथा ७२ बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ सहा. निवडणूक निर्णय अधिकारी विशालकुमार मेश्राम यांनी दिली. भारताचे निवडणूक आयुक्त यांनी १६ मार्चला लोकसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषित केले होते.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात १३ – चंद्रपूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक १९ एप्रिलला जाहिर करण्यात आली. लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने सहा. निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुल यांनी विधानसभा निहाय निवडणूक प्रक्रिया, मतदार, मतदान केंद्र, विशेष व्यवस्था,मतदान प्रक्रियेतील तैनात कर्मचारी यांची पत्रकार परिषदेत माहिती दिली.

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात एकूण ३ लक्ष ९७८ मतदार आहेत. यात पुरूष १,५३,९५६ मतदार तर महिला १४७०१९ आणि इतर मध्ये ३ मतदारांचा समावेश आहे आहे. बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात जुने  ३५७ मतदान केंद्र असून नविन ४ मतदान केंद्र प्रस्तावित केले आहे. असे एकूण ३६१ मतदान केंद्र राहणार आहेत.

संवेदनशिल मतदान केंद्र नसल्याने निरंक दाखवण्यात आला आहे व सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी १ हजार ५८८ कर्मचारी निवडणूक प्रक्रियेसाठी तैनात राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी मुल तहसीलदार मृदुला मोरे, पोंभूर्णा तहसिलदार शिवाजी कदम, आचार संहिता नोडल अधिकारी निलेश चव्हाण, निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

मतदान केंद्रांवर दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, वयोवृद्धसाठी विशेष व्यवस्था : 
मतदान केंद्रांवर दिव्यांग, गर्भवती स्त्रिया, वयोवृध्द मतदारांकरिता सुध्दा विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यांना मतदानाकरिता प्रथम प्राधान्य देण्यात येईल. काहींना जर मतदान केंद्रावर येऊन मतदान करता येणे शक्य न झाल्यास त्यांना पोस्टल मतदानाच्या माध्यमातून घरून मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी १३ डी फार्म निवडणूक निर्णय अधिकारी किंवा सहा. निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करणे आवश्यक आहे. दिव्यांग ४० टक्के पेक्षा वर असणे अपेक्षित आहे. तर ८५वयवर्षे पेक्षा जास्त असलेल्या वृद्धांना पोस्टल मतदानाचा लाभ घेता येईल.

ध्वनीक्षेपकाचा वापर हा सकाळी ६ रात्री १० वा.पर्यंत : 
ध्वनीक्षेपकाचा वापर हा सकाळी ६ रात्री १० वाजेपर्यंत करायचा आहे. यासंबंधाने मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन होईल याची खबरदारी घेण्यात येणार आहे.

पेड न्युजसाठी स्वतंत्र नियंत्रण समिती : 
पेड न्युजसाठी स्वतंत्र नियंत्रण समिती नेमून त्यावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. पेड न्युज प्रसिध्द करता कामा नये. सोशल मिडियामध्ये आक्षेपार्ह मजकुर असल्यास त्यावर कारवाही करण्यात येईल. राजकीय जाहिरातीच्या प्रसारण पूर्व प्रमाणीकरण करण्यासाठी राजकीय पक्ष माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती कडे संपर्क करावा लागेल. त्याअनुषंगाने आयोगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.

असे असणार वेळापत्रक : 
२० मार्च २०२४ अधिसूचना जाहीर करणे, २७ मार्च नामनिर्देशन पत्र दाखल करणे, २८ मार्च त्या पत्राची छानणी, ३० मार्च उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख, १९ एप्रिल मतदान ४ जून २०२४ ला निकाल.

Latest Posts

Don't Miss