Latest Posts

रानटी हत्तीची महाराष्ट्रातून तेलंगणात एंट्री : दोन दिवसांत दोन बळी, शेतकऱ्यांवर हल्ला

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : छत्तीसगड राज्यातून गडचिरोलीत आलेल्या व कळपातून भरटकलेल्या एका रानटी हत्तीने ३ एप्रिल रोजी तेलंगणात एंट्री केली. तेथे या हत्तीने धुडगूस घातला असून सलग दोन दिवसांत दोन शेतकऱ्यांचा पायाखाली चिरडून बळी घेतल्याने भीतीचे वातावरण आहे. सीमावर्ती भागात वनविभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ओडिशातून छत्तीसगडमार्गे गडचिरोलीत तीन ते साडेतीन वर्षांपूर्वी दोन डझन हत्तींनी शिरकाव केला. गडचिरोलीतील घनदाट जंगलात स्थिरावलेल्या हत्तींच्या उपद्रवाने शेतकरी हैराण आहेत. या हत्तींनी धान पिकांसह इतर पिकांचे नुकसान तर केलेच, पण २०२३ मध्ये चार व चालू वर्षी तीन महिन्यांतच तीन बळी घेतले. त्यामुळे भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, कळपातील भरकलेल्या एका हत्तीने ३ एप्रिल रोजी पहाटे मुलचेरा तालुक्यातील नागुलवाही गावाजवळून वाहणाऱ्या प्राणहिता नदी ओलांडून तेलंगाणात प्रवेश केला.

तेलंगणाच्या कुमरमभीम जिल्ह्यातील बुरेपल्ली (ता. चिंतलामानेपल्ली) येथे मिरचीत तोडणीच्या कामात व्यस्त असलेल्या अल्रीु शंकर (४५) या शेतकऱ्यावर हल्ला करत ठार केले. अशातच ४ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या शेतात भात पिकाला पाणी घालत असलेल्या कारू पोशन्ना (५०) या शेतकऱ्यावर रानटी हत्तीने हल्ला केला. त्यानंतर पायाखाली चिरडले. २४ तासांत रानटी हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतल्याने तेलंगणासह गडचिरोलीतील मुलचेरा तालुक्यात वनविभाग सतर्क झाला आहे.

ड्रोन कॅमेऱ्याद्वारे नजर –
तेलंगणातील चिंतलामानेपल्ली तालुक्यातून या रानटी हत्तीने बेजुर तालुक्यातील सुलुगुपल्ली परिसरात आपला मोर्चा वळविला आहे. महाराष्ट्रात सुद्धा आलापल्ली वन विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि आरआरटी पथकाने प्राणहिता नदीलगत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे शोधमोहीम सुरु केली आहे. हत्तीच्या हालचाली टिपण्याचे काम सुरु आहे.

तेलंगणा राज्यात रानटी हत्तीने दोन शेतकऱ्यांचा बळी घेतला आहे . हे हत्ती ट प्राणहिता नदी सीमावर्ती भागात आहेत. कदाचित ते पुन्हा महाराष्ट्राच्या हद्दीत प्रवेश करुन सीमावर्ती भागात येऊ शकतात. त्यामुळे गडअहेरी, चिंचगुंडी, वांगेपल्ली, कृष्णापूर, गेररा, महागाव येथे सतर्कता बाळगावी.

Latest Posts

Don't Miss