विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली (Gadchiroli) : जिल्ह्यात गेल्या दाेन वर्षांपासून रानटी हत्तींच्या कळपाकडून खरीप, रब्बी व उन्हाळी अशा तिन्ही हंगामांतील पिकांची नासधूस केली जात आहे. यावर्षी उन्हाळ्यात छत्तीसगडमध्ये परत गेलेल्या हत्तींनी तीन महिन्यांपूर्वी पुन्हा गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला.
तेव्हापासून हत्तींच्या कळपाकडून पिकांची नासधूस केली जात आहे.
आतातर हाती येणाऱ्या धान पिकाची नासधूस रानटी हत्ती करीत असल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फेरले आहे. हात पीक येण्याऐवजी डाेळ्यांत पाणी आहे. गडचिराेली जिल्ह्यातील वडसा वनविभागात २३च्या संख्येने असलेल्या रानटी हत्तींच्या कळपाने सर्वाधिक नासधूस केली. शेतीपीक, मनुष्यहानी, साहित्य व घरांचीही पाडापाडी करून लाेकांचे नुकसान केले.
एकट्या वडसा वनविभागांतर्गत एकूण ४५४ प्रकरणात १ काेटी ११ लाख १५ हजार ९७२ रुपयांची नुकसानभरपाई देण्यात आली आहे. गडचिराेली वनविभागातील नुकसानभरपाईसुद्धा ३० लाखांच्या आसपास आहे.
पीक नुकसानाची भरपाई ५६ लाखांवर :
रानटी हत्तींनी वडसा वनविभागात यावर्षी ४३७ शेतकऱ्यांच्या १२०.२७ हेक्टर क्षेत्रावरील धान व अन्य पिकांचे नुकसान केले. या नुकसानीपाेटी शेतकऱ्यांना ५३ लाख ९८ हजार ९७२ रुपयांची नुकसानभरपाई वितरित करण्यात आली. गेल्या आठ दिवसांत आणखी ५० ते ६० शेतकऱ्यांच्या धान पिकाची नासधूस हत्तींनी केली. गडचिराेली वन विभागातही हत्तींनी ८० शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. एकूण ५६ लाखांवर भरपाई शेतकऱ्यांना देण्यात आली.
दाेघांचा घेतला बळी :
रानटी हत्तींनी यावर्षी दाेन लाेकांचा बळी घेतला. यामध्ये आरमाेरी वनपरिक्षेत्रातील पळसगाव क्षेत्रात वनाधिकाऱ्यांचे वाहनचालक, तर पाेर्ला वनपरिक्षेत्रातील दिभना येथील एका शेतकऱ्याचा समावेश आहे. यापूर्वी हत्तींनी काेरची तालुक्यातील एक महिला व एक पुरुष, तर धानाेरा तालुक्यातील एका पुरुषाचा बळी घेतला हाेता. आतापर्यंत पाच लाेकांचा बळी हत्तींनी घेतला.