Latest Posts

पर्यटक निवासांमध्ये महिलांना ५० टक्के सवलत : पर्यटनमंत्री गिरीश महाजन

– १ ते ८ मार्चपर्यंत मिळणार मुभा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई (Mumbai) : राज्य सरकारच्या महिला केंद्रित पर्यटन धोरणानुसार महिला पर्यटक व महिला उद्योजकांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून (एमटीडीसी) विविध योजना राबविल्या जात आहेत. या धोरणाचा भाग म्हणून १ ते ८ मार्च २०२४ या कालावधीत महामंडळाच्या सर्वोत्कृष्ट पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सूट दिली जाणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

महामंडळाची एकूण ३४ पर्यटन निवासे, २७ उपहारगृहे असून, निवास व न्याहरी, महाभ्रमण, कलाग्राम, अभ्यागत केंद्र, इको टुरिझम यासारखे अनुभवात्मक उपक्रम आहेत. तसेच अलीकडेच जबाबदार पर्यटनांतर्गत एमटीडीसीने मोठ्या प्रमाणात वाटचाल सुरू केली आहे. त्याचप्रमाणे बीच रिसाॅर्ट, हिल रिसाॅर्ट, जंगल रिसाॅर्ट असे विविध पद्धतीचे पर्यटक निवास व उपहारगृहे तसेच बोट क्लब, स्कुबा डायव्हिंग आदी जलक्रीडा केंद्र पर्यटकांना आकर्षित करतात. महिलांसाठीच्या सवलतीचा लाभ पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन महाजन यांनी केले आहे.

डिस्काउंट प्रोमो कोडचा वापर फक्त एकदाच –
ही सवलत एमटीडीसीच्या लिज प्रॉपर्टीजसाठी (आंबोली, त्र्यंबकेश्वर, तुळजापूर) केलेल्या बुकिंगसाठी आणि इतर कोणत्याही ओटीए (OTA) प्लॅटफॉर्मवरून केलेल्या बुकिंगसाठी वैध नाही. पर्यटकांना डिस्काउंट प्रोमो कोडचा वापर फक्त एकाच वेळी करता येईल. या संधीचा लाभ घेण्यासाठी यापूर्वी केलेल्या बुकिंगवर प्रोमो कोड लागू होणार नाही. या अटी व शर्ती कोणत्याही वेळी पूर्वसूचनेशिवाय बदलण्याचा अधिकार एमटीडीसीने राखून ठेवले आहे. हा प्रोमो कोड वापरून एकावेळी फक्त एका कक्षाचे बुकिंग करता येईल. ज्यांच्या नावावर बुकिंग केले जाईल, त्या व्यक्तीने चेक-इनच्या वेळी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. अन्यथा, बुकिंगची पूर्ण रक्कम जमा करावी लागेल.

– या संधीचा लाभ घेण्याकरिता महामंडळाच्या www.mtdc.co. या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. यासाठी नियम व अटी आहेत. आपले ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
– ही सवलत केवळ महिला पर्यटकांसाठी आहे. महिला पर्यटक निवासात प्रवेश करताना (चेक-इनच्या) वेळी उपस्थित असणे अनिवार्य आहे. सवलत केवळ १ ते ८ मार्च या कालावधीसाठीच वैध असेल.
– ही सवलत कॉन्फरन्स हॉल, लॉन्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, ऑडिटोरियम यांना लागू नाही. सवलतीमध्ये नाश्त्याचा समावेश नाही. या सवलती अंतर्गत बुकिंगची रक्कम रिफंडेबल आणि हस्तांतरणीय नाही.
– ही सवलत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इतर कोणत्याही सवलतींसोबत जोडली जाऊ शकत नाही. एकावेळी केवळ एकाच सवलतीचा लाभ घेता येईल.

Latest Posts

Don't Miss