Latest Posts

वर्ल्ड कप खो- खोवर हिंदुस्थानची सत्ता : महिलांसह पुरुष संघानेही पटकावले जगज्जेतेपद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली (Navi Delhi) : मरहाटमोळ्या खो- खोची अवघ्या जगाला ओळख करून देणाऱ्या पहिल्यावहिल्या खो- खो वर्ल्ड कपवर हिंदुस्थानच्याच महिला आणि पुरुष संघांनी आपली सत्ता दाखवली. हिंदुस्थानच्या महिला संघाने सलग सात तर पुरुष संघाने विजयाचा षटकार ठोकत जगज्जेतेपद काबीज करत हिंदुस्थानी खो-खोचा अद्वितीय पराक्रम जगाला दाखवून दिला. महिलांच्या जगज्जेतेपदाच्या लढतीत हिंदुस्थाननै नेपाळचा ७८-४० असा सहज पराभव केला, तर पुरुषांच्या संघानेही नेपाळचा ५४-३६ असा धुव्वा उडवला आणि खो- खो जगज्जेतेपदाचा डबल धमाका केला.

पुरुषांचा अंतिम सामनाही महिलांप्रमाणे फारसा रंगला नाही. नेपाळने हिंदुस्थानला चांगली लढत दिली. मध्यंतरापर्यंत नेपाळने चांगली लढत देत १८-२६ असा पाठलाग केला होता. मात्र त्यानंतर हिंदुस्थानच्या आक्रमकांनी ५४-१८ अशी आघाडी फुलवत आपले जगज्जेतेपद निश्चित केले. शेवटच्या डावात नेपाळने ५४- ३६ असा गुणफलक केला असला तरी त्यांनी सामना पहिल्या डावातच गमावला होता.

महिलांच्या अंतिम सामन्यात हिंदुस्थानच्या आक्रमकांनी ३४ गुण टिपत वर्ल्ड कप हमारा है चे संकेत दिले. पहिल्या डावात कर्णधार प्रियांका इंगळे, रेश्मा राठोड यांनी चमकदार कामगिरी केली. मग दुसरया डावात नेपाळच्या पहाडी मुलींनी कमालीचा खेळ करत हिंदुस्थानच्या ड्रीम रन गुणसंख्येला वेसण घातली. या डावात नेपाळच्या मुलींनी जोरदार खेळ करत हिंदुस्थानला आव्हान देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे मध्यंतराला ३४-२४ अशी गुणसंख्या झाली होती. त्यानंतर तिसऱ्या डावात हिंदुस्थानने सुसाट आणि भन्नाट खेळ करत नेपाळच्या संरक्षकांना आपल्या आवाक्यात घेत गुणसंख्या ७३-२४ करत जगज्जेतेपदावरील आपली पकड अधिक मजबूत केली. नेपाळने शेवटच्या डावात गुणफलक ७३-४० असा संपवला.

हिंदुस्थानने साखळी फेरीत दक्षिण कोरिया, इराण आणि मलेशियावर विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. त्यानंतर बांगलादेशवर उपांत्यपूर्व फेरीत आणि दक्षिण आफ्रिकेवर उपांत्य फेरीत शानदार विजय मिळवत अंतिम सामन्यात प्रवेश केला.

हिंदुस्थानात या विजयाचा उत्सव सुरू आहे. घराघरात टीव्ही स्क्रीनसमोर तासन्तास खो-खोच्या सामन्यांचा आनंद घेतलेल्या चाहत्यांनी जल्लोष केला. खो-खो विश्वचषक २०२५ मध्ये हिंदुस्थानी संघाचा विजय ही केवळ खेळातील नव्हे, तर हिंदुस्थानी स्वाभिमानाची आणि परंपरेची जागतिक पातळीवरील विजयगाथा आहे.

खो- खो या पारंपरिक हिंदुस्थानी खेळाने जागतिक पातळीवर आपले अस्तित्व दाखवले आहे. हा विजय केवळ संघाचा नव्हे, तर हिंदुस्थाना क्रीडा संस्कृतीचा मोठा विजय आहे. देशभरातून खेळाडूंचे कावतुक होत असून हा क्षण पिढ्यान्प्ढिया लक्षात ठेवला जाईल.

Latest Posts

Don't Miss